या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

 

बदलापूर शहरात जागोजागी सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांमुळे शहरातील जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड फिरविण्याचे प्रकार सुरू आहेत. एकीकडे राज्यभर वृक्षलागवडीची मोठी मोहीम आखली जात असताना रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये वृक्षांच्या पुनरेपणाचे किमान प्रयत्न सुरू असताना बदलापुरात त्यादृष्टीने कोणतीही हालचाल सुरू नसल्याने या नाराजीत आणखी भर पडली आहे.

येत्या १ जुलै रोजी राज्यात दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प सरकारतर्फे सोडण्यात आला आहे. त्यासाठी वन व सामाजिक वनीकरण विभाग आणि महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ यांच्यामार्फत किमान दीड कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. उर्वरित वृक्षलागवड इतर विभागांकडून करण्यात येणार आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आपापल्यापरीने वृक्षलागवडीचे लक्ष्य निश्चित केले आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेतर्फे सुमारे दोन हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी नुकतीच एका विशेष सभा बोलावण्यात आली. एकीकडे वृक्षरोपणाची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे रस्ते रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या कामात गेल्या तीन महिन्यांत अनेक वृक्षांची कत्तल झाल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे यात शहरातील अत्यंत जुन्या वृक्षांचा समावेश आहे. मोठय़ा प्रमाणावर वृक्षांची कत्तल सुरू असताना पुनरेपण तसेच इतरत्र लागवडीविषयी कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

शहरातील रेल्वे स्थानकालगत असलेल्या स्कायवॉकजवळील झाडे यापूर्वीच तोडण्यात आली होती. तसेच रेल्वे स्थानक ते बेलवली रस्त्यावरील अनेक वृक्ष रुंदीकरणासाठी तोडण्यात आली आहेत. सध्या दत्त चौक परिसरात रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. तेथील एका इमारतीसमोरील झाडे नुकतेच पाडण्यात आली आहेत. तसेच नव्या रस्त्याच्या कामासाठी पुढील झाडेही तोडण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कंत्राटदाराकडून झाडे तोडण्याच्या मोबदल्यात दहा झाडे लावण्याच्या अनुषंगाने दंड आकारत असते. मात्र त्या रक्कमेतून नव्या वृक्षांची लागवड केली जाते का, याविषयी पुरेशी स्पष्टता नाही. बदलापूर पूर्वेतील कात्रप भागातून जाणाऱ्या कर्जत महामार्गाच्या उभारणीदरम्यान अशाच प्रकारे झाडे तोडण्यात आली होती. या वृक्षांचे अजूनही पुनरेपण केलेले नाही.

पुनरेपणाचा अवलंब का नाही?

ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील रस्त्यांचे रुंदीकरण करताना कापल्या गेलेल्या वृक्षांचे पुनरेपण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर पुनरेपणाचा प्रयत्नही सुरू झाला आहे. पुनरेपणाचे तंत्रज्ञान उपलब्ध असताना बदलापुरात याविषयी पुढाकार का घेतला जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree cutting in badlapur due to the road winding projects
Show comments