लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या फडके रस्त्यावरील बाजीप्रभू चौक भागात एक गुलमोहराचे झाड सोमवारी दुपारी बारा वाजता पाऊस, वारा, वीज नसताना अचानक कोसळले. त्यावेळी तेथून वाहन, पादचारी जात नव्हते. यामुळे जीवित, वित्त हानी झाली नाही. झाड पडल्याने रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली होती. अखेर अग्निशमन दलाने झाड बाजूला करून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा केला.

झाड कोसळल्याने फडके रस्ता वाहनांसाठी बंद झाला. डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहने अचानक मदन ठाकरे चौक, एचडीएफसी बँक रस्त्यावरून नेहरू रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे चालकांना न्यावी लागली. अरूंद नेहरू रस्त्यावर एकावेळी रिक्षा, खासगी वाहने आल्याने या रस्त्यावर कोंडी झाली. डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने आणि वाहतूक पोलीस आणि वाहतूक सेवक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी फडके रस्त्यावर कोंडी होणार नाही या दृष्टीने वाहतुकीचे नियोजन केले.

आणखी वाचा-कल्याण: लोकलमध्ये लंपास झालेले दागिने पुन्हा मिळाले

काही वेळ सुयोग हाॅल येथून टिळक रस्ता, फडके रस्ता भागात येणारी वाहने सुयोग हॉल येथून इंदिरा चौक भागात वळविण्यात आली. झाड कोसळल्याची माहिती तातडीने वाहतूक सेवक दिनकर सोमासे यांंनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाची बहुतांशी वाहने कोसळलेली झाडे रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी गेली होती. यामुळे बराच उशीर फडके रोडवर अग्निशमन विभागाची वाहने पोहचली नव्हती.

झाडांच्या फांद्यांचा पसारा रस्त्यावर पसरल्याने पादचाऱ्यांना या भागातून चालणे अवघड झाले होते. या झाडाच्या खाली आणि समोरील भागात फळ, भाजीपाला, इतर विक्रेते व्यवसाय करतात. परंतु, सुदैवाने ते अपघातामधून बचावले. इतर ठिकाणची कामे उरकून अग्निशमन विभागाचे पथक फडके रस्त्यावर आले. त्यांनी कोसळलेल्या झाडाच्या फांद्या बाजुला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. तोपर्यंत फडके रस्ता परिसरातील गल्लीतील रस्त्यांवर कोंडी झाली होती. या भागात आगरकर पथावर काँक्रीटचे काम सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.

Story img Loader