महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून त्यादरम्यान वृक्ष उन्मळून पडण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या चोवीस तासात शहरात तब्बल १५ वृक्ष उन्मळून पडले आहेत. ९ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. तर, २ झाडे धोकादायक स्थितीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे ठाण्यात वृक्ष उन्मळून पडण्याचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे.
ठाणे शहरात यापूर्वी पावसाळ्यात धोकादायक वृक्ष पडून नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी पालिकेने शहरातील वृक्षांची पाहणी करून १०६ वृक्ष धोकादायक म्हणून घोषित केले होते. हे सर्व वृक्ष पालिकेने काढून टाकले होते. त्यानंतरही मुसळधार पावसादरम्यान शहरात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येते. गेल्या महिनाभरात संपूर्ण शहरात शंभरहून अधिक वृक्ष उन्मळून पडले आहेत. गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्यानंतर शहरात वृक्ष पडण्याचे सत्र थांबले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढताच वृक्ष उन्मळून पडण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे.
गेल्या चोवीस तासात शहरात तब्बल १५ वृक्ष उन्मळून पडले आहेत. ९ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. तर, २ झाडे धोकादायक स्थितीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नसले तरी यामुळे शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच वृक्ष उन्मळून पडल्यानंतर त्याचे पुनर्रोपण करणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वृक्ष प्राधिकरण विभागाला उन्मळून पडलेली वृक्ष पाहणीदरम्यान धोकादायक असल्याचे दिसून आले नव्हते का आणि पडण्याच्या स्थितीत असलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी काय उपयोजना केल्या, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.