संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असणाऱ्या येऊर परिसरात भारतात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आदिवासी कला आणि संस्कृतीचे कायमस्वरूपी केंद्र उभारण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध कलावंत आणि जगभरातील अक्षरधाम मंदिरांचे मुख्य आरेखक (मास्टर प्लॅनर) अरूणकुमार यांनी या केंद्राचा आराखडा तयार केला असून हे केंद्र जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सुप्रसिद्ध अक्षरधाम मंदिराचा मुख्य आराखडा आणि भूदृश्यरचना साकारणारे अरुणकुमार ठाणेकर आहेत. याशिवाय जगभरातील अनेक पर्यटनस्थळे आणि पंचतारांकित हॉटेल्स विकसित करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. आपल्या या कलेचा ठाणे शहरासाठी काहीतरी उपयोग व्हावा, याच इच्छेतून त्यांनी ‘उपवन आर्ट फेस्टिव्हल’ची संकल्पना मांडली. गतवर्षी प्रचंड लोकप्रिय ठरलेला हा उत्सव यंदा मात्र राजकीय आणि आर्थिक गणितांमुळे बारगळला. मात्र, आता आदिवासी कला केंद्राच्या माध्यमातून अरुण कुमार यांनी ठाण्याच्या पर्यटनाला चालना देणारी योजना आखली आहे. वनविभाग, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविला जाणार असून ठाण्यातील लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. येऊरमधील साडेचार एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात येईल. त्यासाठी जागेचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. एकही वृक्ष न तोडता, नैसर्गिक जंगलाचा वापर करून हे पर्यटन केंद्र उभारण्यात येईल. त्यात देशभरातील आदिवासींनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केंद्र असेल. त्यात कपडे, कशिदागिरी, दागिने, चित्रे आदींचा समावेश असेल. या केंद्राच्या निमित्ताने आदिवासी कलाकुसरीला एक कायमस्वरूपी बाजारपेठ मिळेल. चुलीवरचा रूचकर स्वयंपाक, रात्रीच्या वेळी मध्यवर्ती खुल्या व्यासपीठवर आदिवासी नृत्य संगीताची मेजवानी असणारे कॅम्पफायर, निवासासाठी पंचतारांकित सुविधा असणाऱ्या पारंपारिक झोपडय़ा आणि आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणारे दृकश्राव्य सादरीकरण असे या केंद्राचे स्वरूप असेल.
प्रशांत मोरे, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा