शहापूर : आदिवासी विकास महामंडळाच्या १६ कोटी रुपयांचे बोगस भात खरेदी प्रकरण दोन महिन्यांपूर्वी उजेडात आल्यानंतर विभागाकडून सर्वच भात गोदामांची तपासणी करण्यात येत होती. या तपासणीत शहापूर आणि कर्जत तालुक्यात साडेचार कोटी रुपयांची बोगस भात खरेदी झाल्याचे समोर आले. त्यामुळे बोगस भात खरेदीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहापूर तालुक्यात जुलै महिन्यात ५३ हजार क्विंटलच्या भात खरेदीत १६ कोटी रूपयांची बोगस भात खरेदी झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच गुन्हे दाखल झाल्यानंतर शहापुरच्या महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्वच भात गोदामांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली होती. यामध्ये पुन्हा एकदा शहापुर तालुक्यातील साकडबाव व वेहळोली व रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सुगवे केंद्रात बोगस भात खरेदी झाल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा >>> ठाणे जिल्हा रुग्णालयावर रुग्णांचा भार वाढला; शंभर अतिरिक्त खाटा वाढविण्याचा निर्णय

शहापुर तालुक्यातील साकडबाव केंद्रात दोन कोटी ८३ लाख रूपयांच्या १३ हजार ८९२ क्विंटल भात खरेदीपैकी एक कोटी ५६ लाख रूपये तर वेहळोली येथे चार कोटी ४२ लाख रूपयांच्या २१ हजार ६७५ क्विंटल भातापैकी एक कोटी ९८ लाख रूपयांचा बोगस भात खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. कर्जतमधील सुगवे केंद्रात देखील दोन कोटी ६५ लाख रूपयांच्या १३ हजार क्विंटल भातापैकी दोन हजार ७०० क्विंटलचा एकूण ८४ लाख रूपयांचा बोगस भात खरेदी झाला आहे.

हेही वाचा >>> जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन महत्वाचे; अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांचे प्रतिपादन

याबाबतचा अहवाल जव्हारच्या प्रादेशिक व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, शहापुर तालुक्यातील अघई व मुरबाड तालुक्यातील माळ या केंद्रातील भात खरदेची मोजदाद सुरू असल्याचे शहापुरचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे यांनी सांगितले. यावर्षी भात खरेदी पारदर्शी होणार असून भात खरेदीसाठी पीकपाणी नोंद असलेले सातबारे ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribal development corporation bogus rice purchase exposed again ysh
Show comments