गणेशोत्सवाच्या काळात रोजगाराचे साधन; आयुर्वेदिक उपयोगांबाबत अज्ञान; उलाढाल मात्र लाखोंच्या घरात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवात पूजेच्या आरासांत वेगवेगळ्या वस्तूंचा ज्या प्रकारे सहभाग असतो, त्याच प्रकारे जंगली वनस्पतींचा समावेश असलेल्या पत्रींचा वापरही मोठय़ा प्रमाणावर केला जातो. धकाधकीच्या जीवनात एका दिवसात पूजेची तयारी करणाऱ्या चाकरमान्यांना मात्र या पत्रींबाबत ज्ञान नसल्याचे समोर आले आहे. मात्र तरीही अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांत या वनस्पती पाल्यांची लाखो रुपयांची विक्री होते. त्यामुळे आदिवासींना रोजगार उपलब्ध होतो.

गणेशोत्सवाच्या पूजेमध्ये निरनिराळ्या वनस्पतींची पाने वापरली जातात. त्याला पत्री असे म्हटले जाते. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक आदिवासी बांधव अंबरनाथ आणि बदलापूर शहरात या पत्रींची विक्री करण्यासाठी येत असतात. या पत्रींमध्ये अनेक औषधी वनस्पतीही पाहायला मिळतात. बेलाची पाने, पिंपळ, दुर्वा, तुळस, माका, रूई, केवडा, अगस्ती, कन्हेर, जाई, धुणा, धापा, कळ्याची फुले अशा अनेक वनस्पतींचा त्यात समावेश असतो. दुंडय़ाच्या पानांमध्ये यांना एकत्रित ठेवण्यात येते. एकत्रित पत्रींची जुडी साधाणत: ३० ते ५० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे. त्यानंतर केवडा सर्वात महागडे पत्र असून दुर्वा आणि तुळस सर्वात स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात साधारणत: ३०० आदिवासी बांधव याची विक्री करताना दिसतात. गणेश चतुर्थी, गौरी आवाहन आणि अनंत चतुर्दशी या दिवशी होणाऱ्या पूजेसाठी या पत्रींचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो.  त्यामुळे गेल्या सात ते आठ दिवसांत या  माध्यमातून आदिवासींनी लाखोंची उलाढाल केल्याचे बोलले जाते.