ठाणे : आदिवासींच्या जमीनींवर सरकारचा डोळा असून क्लस्टर, झोपू योजनेच्या नावाखाली आदिवासींच्या घरावर सरकारने बुल्डोजर चालविण्याचा कार्यक्रम हाती घेतल्याचा आरोप करत ठाण्यातील आदिवासींनी उद्या, २३ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून हा मोर्चा काढला जाणार आहे. वर्तकनगर जवळील चिराग नगर ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा असेल.

ठाणे जिल्ह्यात आदिवासींचे वास्तव्य मोठ्याप्रमाणात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर, कोकणीपाडा भागात मोठ्याप्रमाणात आदिवासी राहतात. शहरात ५० हून जास्त आदिवासी पाडे आहेत. आदिवासी एकता परिषदेने त्यांच्या निवेदनात आरोप केला आहे की, ठाणे जिल्हा पूर्वीपासून आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु विकासाच्या नावाने आदिवासींचे अस्तित्त्व नष्ट करण्याचे काम शासन-प्रशासन व्यवस्थेने सुरू केले आहे. भारतीय संविधानाची पायमल्ली सुरु आहे.

आदिवासी हजारो वर्षांपासून येथे राहत आहे. त्याचे मूलभूत, नैसर्गिक आणि सांविधानिक अधिकार नाकारून त्यांना देशोधडीला लावले जात आहे. ठाणे शहरात टोलेजंग इमारती, माॅल, येऊरमध्ये फार्म हाऊस, लाॅन्स हे सर्व आदिवासींच्या मालकी आणि वनहक्क जमिनीवर कायदे नियम धाब्यावर बसवून उभे केले आहेत. आदिवासींच्या घराखाली जमीन आहे. त्यावरही आता डोळा असून झोपू, क्लस्टर, पर्यावरण रक्षणाच्या नावाने ‘पीएमएवाय २.०’ या योजना दाखवून आदिवासींच्या घरावर बुल्डोजर चढविण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे.

आदिवासी पाड्यांना पूनर्वसनाच्या गोड नावाखाली नेस्तनाभूत करण्याचा डाव आखला जात असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरु असलेल्या वन विभागाच्या सर्वेक्षणासही विरोध असल्याचे म्हटले आहे. सरकारी जमीनीवर पात्र आदिवासींना झोपू किंवा क्लस्टर लागू करण्याऐवजी त्या जागेवरील निवासासाठी केलेले अतिक्रमण नियमाकुल करावे अशी मागणी देखील पत्रात करण्यात आली आहे. यासह विविध मागण्या या मोर्चा द्वारे केल्या जाणार आहे. आदिवासी एकता परिषदेने या मोर्चाचे आयोजन केले आहे.

मोर्चा कसा असेल

वर्तकनगर येथील चिरागनगर भागात बुधवारी सकाळी १०.३० वाजता सर्व आदिवासी एकत्र जमणार आहेत. त्यानंतर हा मोर्चा कोर्टनाका येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून डाॅ. सुनील पऱ्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर शिष्टमंडळाच्या माध्यमातून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जाणार आहे.