सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाबपुष्प कुणाला बरे आवडत नाही? ‘फुलांचा राजा’ असे संबोधल्या जाणाऱ्या या फुलाचा मोह प्रत्येकालाच आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सारेच गुलाबावर प्रेम करतात. त्याचे मनमोहक सौंदर्य आणि सुवास आपले लक्ष वेधून घेतो. आपल्या घराच्या खिडकीत किंवा बागेत एक तरी गुलाबाचे रोप असावे असे प्रत्येकालाच वाटते. पण डोंबिवलीमध्ये तर अख्खी गुलाबबागच फुलली आहे. डोंबिवलीच्या राजूनगर भागात तब्बल एक एकर जागेत विविध रंगांची, विविध आकाराची आणि विविध प्रजातीची गुलाबपुष्पे फुलविण्यात आली आहेत. ही मनमोहक गुलाबबाग सध्या सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे.
डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा परिसरातील राजूनगर भागात हे उद्यान आहे. उद्यानाचे नाव आहे ‘श्रीधर परशुराम म्हात्रे उद्यान.’ उद्यानात प्रवेश करतेवेळीच रंगबेरंगी गुलाबपुष्पे लक्ष वेधून घेतात. या उद्यानाला तारेचे कुंपण आहे. आतमध्ये एक एकर जागेत आठ वाफे करण्यात आले असून या वाफ्यात लाल आणि काळय़ा मातीमध्ये ही गुलाबरोपे उगविण्यात आली आहेत. रोपांना फुले लागल्यानंतर ती आकर्षक वाटावी यासाठी आकार आणि रंगसंगतीनुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. म्हणजे एकाच रंगाचे गुलाब शक्यतो एकाच ठिकाणी लावण्यात आले आहेत. लाल, पिवळा, पांढरा, गुलाबी, नारंगी आदी रंगांचे आकर्षक गुलाब या उद्यानात आहेत. काही गुलाबांचा सुगंध दरवळत असल्याने या उद्यानात फेरफटका मारताना मनास प्रसन्न वाटते. येथे मुबलक प्रमाणात फुले असल्याने फुलपाखरे येथे फिरत असतात. संध्याकाळच्या वेळेच लहान बालके या गुलाबाच्या सान्निध्यात बागडतात आणि वृद्ध लोक या मनमोहक वातावरणात विसावा घेण्यासाठी येतात.
बंगलोर येथील केएसजी नर्सरीच्या कस्तुरीरंगन नर्सरीतून गुलाबाची रोपे मागविण्यात आल्यानंतर त्यांची येथे लागवड करण्यात आली. शास्त्रोक्त पद्धतीने आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानात भारतीय आणि परदेशी प्रजातीची तब्बल ६०० प्रकारची गुलाबाची रोपे आहेत. एलिझाबेथ टेलर, इंदिरा गांधी, अब्दुल कलाम, जनरल अरुण वैद्य, डॉ. बी. पी. पाल यांच्या नावांचीही गुलाबपुष्पे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचे गुलाबपुष्पही येथे तयार करण्यात आले होते. मात्र ते रोप नंतर दिल्लीला नेण्यात आले.
त्याचबरोबरच टेडोरा पार्क, चाब्लिस, एनव्हीएस२, अनुसूया, बोरा बोरा, अँटिक रोज अशा प्रकारचेही गुलाबपुष्प येथे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे येथील रोपांना दर महिन्याला कशा प्रकारे खते व कीटनाशकांची फवारणी केली जाते, त्यांची निगा कशी राखली जाते याची सविस्तर माहिती उद्यानाच्या भिंतीवर देण्यात आली आहे. हा परिसर प्रदूषणमुक्त आणि शहरापासून
काहीसा दूर असल्याने गुलाब फुलण्यासाठी चांगले वातावरण आहे. या उद्यानातून फिरताना आणि
गुलाबाचे देखणे रूपडे न्याहाळताना मनास एक वेगळाच आनंद मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुलाब उद्यान, डोंबिवली
डोंबिवली पश्चिम स्थानकाबाहेर राजूनगरला जाणाऱ्या रिक्षा मिळतात. राजूनगर रिक्षा स्टॅण्डपासून चालत पाच मिनिटे अंतरावर हे उद्यान आहे.
’ वेळ : संध्याकाळी ५ ते १०.

गुलाब उद्यान, डोंबिवली
डोंबिवली पश्चिम स्थानकाबाहेर राजूनगरला जाणाऱ्या रिक्षा मिळतात. राजूनगर रिक्षा स्टॅण्डपासून चालत पाच मिनिटे अंतरावर हे उद्यान आहे.
’ वेळ : संध्याकाळी ५ ते १०.