ठाणे जिल्ह्यात जशी अनेक शिवमंदिरे आहेत, त्याचप्रमाणे काही गणेश मंदिरे आहेत. टिटवाळा येथील महागणपतीचे स्थान म्हणजे तर तीर्थक्षेत्रच. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील उपवन तलावाजवळील गणेश मंदिर, भिवंडी तालुक्यातील अणजूर येथील पुरातन वाडय़ातील गणेश मंदिरही प्रसिद्ध आहेत. या यादीत आणखी एक नावाची भर पडू शकते, ते म्हणजे शिळफाटा येथील गणेश घोळ मंदिर.
कल्याणहून नवी मुंबईकडे जाताना बऱ्याच गाडय़ा शिळफाटय़ाकडे न जाता कल्याण फाटय़ावरून एका खिंडीतील रस्त्याने जातात. हा जवळचा रस्ता असल्याने कारचालक किंवा दुचाकीस्वार तो अवलंबतात. या रस्त्यावर कल्याण फाटय़ावरून काही अंतर चालल्यानंतर एक पायऱ्या पायऱ्यांचा थर डोंगरावर गेलेला दिसतो. या पायऱ्या जेथून सुरू होतात, तिथे ‘गणेश घोळ मंदिर’ नावाची पाटी दिसते. यावरून वर डोंगरावर एखादे मंदिर असणार, याची कल्पना येते. बाजूने दाट वनराई आणि त्यामधून जाणारा नागमोडी वळणांचा हा पायऱ्यांचा रस्ता चालताना खूपच मस्त वाटते. कल्याण-शिळ रस्त्यावरील प्रदूषणापासून सुटका झाल्याचे समाधान मिळते.. येथे आल्यावर थकलेले अंग पुन्हा ताजेतवाने होते. किमान शंभर एक पायऱ्या असतील, पण त्या चढताना अजिबात दमायला होत नाही. घनदाट झाडी आणि डेरेदार वृक्ष बाजूला असल्याने गारवा वाटतो. एकेक पायरी चढताना आजूबाजूची अनेक फुलझाडे, वेगळय़ा प्रकारचे वृक्ष न्याहाळत आपण पुढे पुढे जात राहतो.. साधारण १५ ते २० मिनिटांनंतर आपण डोंगरावरील मंदिरापर्यंत पोहोचतो. हे मंदिर अगदी साधेसुधे असून अगदी लहान आकाराचे आहे. मंदिरात गणेशाची एक जुनी व एक नवी अशा दोन मूर्ती आहेत.. नवी मूर्ती नंतर बसविण्यात आली असावी, असे वाटते. मंदिराचा एक भाग दगडाच्या खोबणीत बसविला आहे.. या मोठय़ा दगडातही कोरून काही शेंदूर फासलेल्या मूर्त्यां बसविण्यात आल्या आहेत.
मंदिराचा परिसरही अतिशय सुंदर आणि ताजातवाना करणारा आहे. पण या मंदिराच्या बाजूला काही साधूंनी त्यांचे आश्रम उभारले असल्याने मंदिराच्या भोवतालची शोभा गेलेली आहे. हे साधू बऱ्याच वेळा तिथे होम-हवन करत असल्याने मंदिर परिसरात धुराचे साम्राज्य असते, त्याचबरोबर येथील शांततेत आणि निवांतपणात या आश्रमामुळे बाधा येत असल्याचे वाटते. पण बाकी हा परिसर अतिशय रमणीय आणि मन प्रसन्न करणारा आहे. येथे काही वेगवेगळय़ा प्रकारची फुले पाहायला मिळतात, तर काही वेगळय़ाच वनस्पती आढळतात. त्यामुळे येथे छायाचित्रे काढण्याचा मोह आवरता येत नाही. पायऱ्या उतरताना आपण पुन्हा या वनस्पती न्याहाळू लागतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा