लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली शहराच्या विविध भागात सीमेंट काँक्रीट रस्त्याची कामे एमएमआरडीएकडून सुरू आहेत. या रस्ते कामांलगत गटार बांधणीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी सेवा वाहिन्या टाकण्यासाठी जागोजागी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. या खोदकामांमुळे डोंबिवली शहराच्या पूर्व, पश्चिम भागात उडणाऱ्या धुळीने नागरिक, व्यापारी त्रस्त आहेत. ही धूळ सीमेंट मिश्रित असल्याने नागरिक सर्दी, खोकल्याच्या व्याधीने त्रस्त आहेत.

रस्त्यांवरील धूळ दुकानात वाऱ्याने उडून येते. ग्राहकाला आहे त्या स्थितीत दुकानातील वस्तू दिली तर ती धूळभरित वस्तू जुनी आहे असे समजून ग्राहक अनेक वेळा ती वस्तू घेण्यास नकार देत आहेत, असे अनेक दुकानदारांनी सांगितले. दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानातील खाद्य पदार्थांवर धूळ बसत असल्याने दुकानदार त्रस्त आहेत.डोंबिवलीत सीमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे एमएमआरडीएच्या ठेकेदाराकडून उरकली जात आहेत. या रस्त्यांवर पुरेसे पाणी मारले जात नाही. हा रस्ता २० दिवसात वाहतुकीसाठी खुला केला की या रस्त्यावरील सीमेंट मिश्रित धूळ दिवसभर उडत राहते.

आणखी वाचा-‘मेट्रो ४’च्या खर्चात तब्बल १२७४.८० कोटी रुपयांनी वाढ

डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगरमध्ये राघो आबा सोसायटी ते जानकी व्हिला सोसायटी दरम्यानच्या रस्त्यावर सततच्या वाहन वर्दळीमुळे खड्डे पडले आहेत. या खड्यांमधील धूळ दिवसभर उडत राहतो. सुनीलनगर भागात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे मजबूत होण्यासाठी या रस्त्यांवर भरभूर पाणी मारण्याच्या सूचना ठेकेदारांना कराव्यात. तसेच या भागातील खड्डे बुजविण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेशीत करावे, अशी मागणी माजी नगरसेवक भगवान पाटील यांनी शहर अभियंता अनिता परदेशी यांच्याकडे केली आहे.

भागशाळा मैदान, सुभाष रस्ता भागात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे धुळीचा उधळा उडत आहे. भागशाळा मैदान परिसरात सकाळपासून ते रात्री लहान मुले, ज्येष्ठ, वृध्द फिरण्यासाठी येतात. त्यांना या धुळीचा सर्वाधिक त्रास होत आहे. सुभाष रस्त्यावर गटारांची कामे सुरू आहेत. ही कामे करताना पाण्याचे फवारे मारावेत जेणेकरून धूळ उडणार नाही, अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.

आणखी वाचा-पालिकेच्या जागेत पीओपी मुर्ती विक्रीस बंदी? ठाणे महापालिका तयार करतेय नियमावली

देवी चौक, ठाकुरवाडी, जुनी डोंबिवली भागात नवीन सीमेंट काँक्रीट रस्त्यांवरून धुळ उडत आहे. नागरिक विविध व्याधींनी त्रस्त आहेत, अशा तक्रारी या भागातील रहिवासी प्रशांत जोशी, नवीन भानुशाली, मामा नाटेकर यांनी केल्या. धुळीच्या त्रासाचे रुग्ण अधिक प्रमाणात उपचारासाठी येत आहेत, असे अनेक डाॅक्टरांनी सांगितले. धुळीचा उधळा शमविण्यासाठी सकाळी, रात्री धूळ शमन यंत्राचा वापर केला जातो, असे एका स्वच्छता अधिकाऱ्याने सांगितले. अधिक माहितीसाठी मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Story img Loader