ठाणे : अरुंद रस्ते, मेट्रोची कामे अशा विविध कारणांमुळे कोंडीत अडकणाऱ्या ठाणेकरांची वाट दारुच्या बाटल्यांनी अडविली. घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने दारुच्या रिकाम्या बाटल्या वाहून नेणारा ट्रक एका बेस्ट बसगाडीवर आदळला. या अपघातात ट्रक उलटून सर्वत्र रिकाम्या बाटल्यांच्या खोक्यांचा खच पडला. त्यामुळे अपघातग्रस्त वाहने आणि दारुच्या बाटल्यांचा खच रस्त्यावरुन काढण्याची वेळ पोलीस आणि बचाव पथकांवर आली. या अपघातामुळे गायमुख घाट ते चेना ब्रिज पर्यंत दोन्ही मार्गावर कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले.
घोडबंदर मार्गावरुन दिवसाला हजारो अवजड वाहनांची वाहतुक होत असते. याच मार्गावरुन गुजरात येथून सुटणारी वाहने उरण जेएनपीटी, भिवंडीत येत असतात. तसेच हलक्या वाहनांची देखील मोठी वाहतुक होते. परंतु घोडबंदर मार्गावर विविध ठिकाणी मेट्रोची कामे किंवा इतर प्राधिकरणांची कामे सुरु आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतो. घोडबंदर मार्गालगत लोकवस्ती वाढल्याने कोंडीत भर पडत असते. मंगळवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास गुजरातहून मुंबईत एक ट्रक येत होता. त्यामुळे मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचे खोके होते. हा ट्रक गायमुख घाटात आला असता, वाहन चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक येथील बेस्टच्या बसगाडीला धडकून उलटला.
त्यानंतर बसगाडीमधील सर्व रिकाम्या बाटल्यांचे खोके रस्त्यावर पडले, घटनेची माहिती कासारवडवली वाहतुक पोलीस, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. रस्त्यावर बाटल्यांचा खच पडल्याने मार्गावर कोंडी झाली. दोन्ही मार्गावर त्याचा परिणाम झाला.
बेस्ट बसचालक जखमी
या अपघातात ट्रक एका बेस्ट बसगाडीला देखील धडकला. अपघातात बेस्ट बसगाडीचा चालक हर्षल कासकर (३२) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्या उजव्या डोळ्यालगत किरकोळ मार लागला.
बाटल्यांचा रस्त्यावर खच
या अपघातामुळे बाटल्यांचा रस्त्यावर खच पडला होता. बचाव पथकाने हे खच बाजूला करण्यासाठी जेसीबी यंत्रांचा वापर केला. तर अपघातग्रस्त ट्रक हायड्रा क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला.
कोंडीमुळे हाल
अपघाताचा परिणाम घोडबंदर मार्गावर बसला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अवघ्या १० मिनीटाचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना २५ ते ३० मिनीटे लागत होती. सकाळी ९ नंतरही येथे कोंडी कायम होती. उन्हाचे चटके त्यात कोंडी यामुळे वाहन चालकांचे हाल झाले.