कल्याण- येथील पूर्व भागातील मलंग गड रस्त्यावरील एका घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सी बाहेरील ट्रकमध्ये ठेवलेले रिकामे सिलिंडर भंगारात विकण्याचा प्रयत्न एका भुरट्या चोराने केला. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी एका भुरट्या चोराला मंगळवारी अटक केली.
रसिक पठाण असे अटक आरोपीचे नाव आहे. कल्याण पूर्वेतील मलंग गड रस्त्यावर एक गॅस एजन्सी आहे. या एजन्सीमधील रिकामे झालेले सिलिंडर ट्रकमध्ये भरुन ते मध्यवर्ति पुरवठा केंद्रात नेण्यात येणार होते. सिलिंडर भरल्यानंतर ट्रकची पाठीमागील बाजू बंदिस्त करण्यात आली होती. ट्रक चालक, साहाय्यक भोजनास निघून गेल्यानंतर एका भुरट्या चोराने साथीदाराच्या मदतीने बंदिस्त बाजू उघडून त्यामधील दोन सिलिंडर घाईने ट्रकमधून उतरविले. ते भंगारात विकून त्यामधून पैसे कमविण्याचा प्रयत्न केला.
कोळसेवाडी पोलिसांची मलंग गड परिसरात रात्रीच्या वेळेत गस्त सुरू होती. त्यांना गॅस एजन्सीच्या बाहेर एक तरुण संशयितरित्या हालचाली करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला एवढ्या रात्रीच्या वेळेत तू येथे काय करतोस अशी विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने ट्रकमधील रिकाम्या सिलिंडरमधील दोन सिलिंडर आपण खाली उतरविले आहेत. ते आपण भंगारात विकणार आहोत, असे सांगितले. चोरीची कबुली देताच पोलिसांनी आरोपी रसिकाला पोलीस ठाण्यात आणले. त्याच्या विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला. रसिकला आणखी एका साथीदाराने चोरीसाठी मदत केली आहे. तो फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.