मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा नुकताच एक महत्त्वाचा टप्पा पार केला. दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामासाठी चार टनेल बोअरिंग यंत्रांची (टीबीएम) आवश्यकता असून यापैकी पहिले टीबीएम यंत्र तयार झाले आहे. इतकेच नव्हे तर या टीबीएमची चाचणीही चेन्नईत यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता एप्रिलमध्ये टीबीएम ठाण्यातील प्रकल्पस्थळी दाखल होणार आहे. स्वदेशी बनावटीचे हे पहिले टीबीएम असून या टीबीएमला ‘नायक’ असे नाव देण्यात आले आहे. कसे असणार ‘नायक’ टीबीएम, कशा प्रकारे हे काम करणार आणि याचा कसा फायदा प्रकल्पासाठी होणार याचा हा आढावा…
ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची गरज
ठाणे – बोरिवली अंतर पार करण्यासाठी सध्या एक ते दीड तासाचा कालावधी लागतो. ठाण्याहून बोरिवलीला रस्तेमार्गे जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठाणे- बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला. पण काही कारणांमुळे हा प्रकल्प २०२१ पर्यंत मार्गी लावणे शक्य झाले नाही. या प्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य सरकारने अखेर २०२१ मध्ये तो एमएमआरडीएकडे वर्ग केला. सरकारच्या निर्णयानुसार एमएसआरडीसीचा मूळ प्रकल्प एमएमआरडीए मार्गी लावत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास ठाणे – बोरिवली अंतर केवळ १२ ते १५ मिनिटांत पार करता येणार आहे.
कसा असेल भुयारी मार्ग?
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प ११.८ किमी लांबीचा असून या प्रकल्पातील दोन बोगदे १०.२५ किमी लांबीचे असणार आहेत. हे दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. हा मार्ग सहा मार्गिकांचा (येण्या-जाण्यासाठी प्रत्येकी तीन) असणार आहे. या प्रकल्पासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. १०.२५ किमी लांबीच्या दुहेरी बोगद्यात प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत. यातील दोन मार्गिका वाहतुकीसाठी असतील, तर एक मार्गिका आपत्कालीन आहे. आग, अपघात वा इतर कोणतीही दुर्घटना घडल्यास तात्काळ रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिसांच्या गाड्या आणि इतर सामग्री या मार्गिकेवरून प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी पोहचवता येणार आहे. विशेष म्हणजे आपत्कालीन स्थितीत वाहनचालक – प्रवाशांना ,तसेच वाहनांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बोगद्यात तब्बल ४५ क्रॉस पॅसेज बनविण्यात येणार आहेत. बोगद्यात प्रत्येक ३०० मीटर अंतरावर एक पादचारी क्रॉस पॅसेज असणार आहे. तर प्रत्येक दोन पादचारी क्रॉस पॅसेजनंतर एक वाहन क्रॉस पॅसेज असणार आहे. हे क्रॉस पॅसेज दोन्ही बोगद्यांना जोडणार आहेत. बोगद्याच्या सुरुवातीला एक नियंत्रण कक्ष असणार असून या कक्षाला अपघात, दुर्घटनेची माहिती मिळाल्याबरोबर अपघातस्थळाजवळील पादचारी क्रॉस पॅसेज आणि वाहन क्रॉस पॅसेजचे दरवाजे उघडले जातील. त्यानंतर नागरिकांना पादचारी क्रॉस पॅसेजने दुसऱ्या बोगद्यात जाता येईल. तर वाहन क्रॉस पॅसेजमधून वाहनांना बाजूच्या बोगद्यात जाता येणार आहे. वाहनचालक – प्रवासी, वाहने सुरक्षित स्थळी आणून त्यांना बोगद्याच्या बाहेर काढले जाईल. एकूणच क्रॉस पॅसेज आणि आपत्कालीन मार्गिकेमुळे बोगद्यातील प्रवास सुरक्षित होणार आहे. या प्रकल्पाचे काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले असून आता कामास सुरुवात झाली आहे.
ऑक्टोबरपासून भुयारीकरण सुरू?
दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम कंत्राटदार म्हणून हैदराबादस्थित मेघा इंजिनीयरिंग कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. या कंपनीने सध्या ठाण्याच्या दिशेने लाॅन्चिंग शाफ्टचे काम सुरू केले आहे. लाॅन्चिंग शाफ्टचे काम सुरू असतानाचा एमएमआरडीएने प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. भुयारीकरणासाठी एकूण चार टीबीएमची आवश्यकता आहे. त्यानुसार चेन्नईतील हेरेनकनेट कंपनीत चार टीबीएमची निर्मिती करण्यात येत असून यापैकी पहिले टीबीएम तयार झाले आहे. या टीबीएमची चाचणीही यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता हे टीबीएम ठाण्यात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या दहा-बारा दिवसांत टप्प्याटप्प्याने हे टीबीएम आणण्यास सुरुवात होणार आहे. ११० भागांमध्ये हे टीबीएम ठाण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये सर्व ११० भाग ठाण्यात येतील आणि त्यानंतर त्यांची जोडणी केली जाईल. सप्टेंबरमध्ये पहिले टीबीएम भूगर्भात सोडण्यात येईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होईल.
स्वदेशी बनावटीचे पहिले टीबीएम?
मुंबई सागरी मार्ग, मेट्रो ३ (कुलाबा – वांद्रे – सीप्झ) सह इतर इतर प्रकल्पांसाठी वापरण्यात आलेले टीबीएम परदेशातून आणण्यात आले होते. मात्र ठाणे – बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी वापरण्यात येणारे चारही टीबीएम पहिले स्वदेशी बनावटीचे असणार आहे. चेन्नईतील हेरेनकनेट कंपनीकडून या चार टीबीएमची बांधणी करण्यात येत आहे. चारपैकी एक टीबीएम तयार झाले असून त्याची चाचणीही यशस्वी झाली आहे. दुसरे टीबीएमही तयार होत असून येत्या काही दिवसांत तेही पूर्ण होईल. त्यानंतर उर्वरित दोन टीबीएमच्या बांधणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. दोन टीबीएम ठाण्याच्या दिशेने, तर दोन टीबीएम बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरण करणार आहेत. ठाण्याच्या दिशेने भुयारीकरणास ऑक्टोबरपासून सुरू होईल. मात्र बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरण सुरू करण्यास काहीसा वेळ लागणार आहे.
दुहेरी बोगदा प्रकल्पातील ‘नायक’ कोण?
दुहेरी बोगद्यासाठी चार टीबीएमचा वापर करण्यात येणार आहे. हे टीबीएम पर्यवारणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील अशा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहे. त्यामुळे येथील पर्यावरणाला आणि वन्यजीव, वन्यप्राण्यांच्या अधिवासाला कोणताही धक्का पोहचू नये या दृष्टीने विशेष काळजी घेऊन त्याधुनिक असे टीबीएम तयार करण्यात येत आहेत. या टीबीएमला राष्ट्रीय उद्यानातील पक्षी, प्राणी, झाडे यांची नावे देण्याची संकल्पना पुढे आली असून पहिल्या टीबीएमचे ‘नायक’ असे नामकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय उद्यानात ‘नायक’ नावाचे एक फुलपाखरू आहे, याच फुलपाखराच्या नावावरून पहिल्या टीबीएमला ‘नायक’ नाव देण्यात आले आहे. तर दुसऱ्या टीबीएमचेही नाव निश्चित झाले असून लवकरच हे नाव जाहीर केले जाणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टीबीएमला झाड वा प्राणी, पक्ष्यांची नावे दिली जाणार असून लवकरच ही नावेही जाहीर होतील. मात्र ठाण्याच्या दिशेने भुयारीकरणाच्या कामाला ‘नायक’ सुरुवात करणार हे नक्की.
नायकचे वैशिष्ट्य काय ?
‘नायक’सह चारही टीबीएममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. १३ मीटर व्यासाचे ,१५० मीटर लांबीचे आणि ६० मीटर रुंदीचे असे हे टीबीएम असणार आहेत. एक टीबीएम अंदाजे २०० टन वजनाचे आहे. या टीबीएमच्या माध्यमातून दिवसाला १५ मीटर भुयारीकरण पूर्ण करता येणार आहे. ‘नायक’ एप्रिलमध्ये आणि त्यानंतर दुसरे टीबीएम ठाण्यात येईल, त्यानंतर तिसरे, चौथे टीबीएम बोरिवलीतील प्रकल्पस्थळी दाखल होतील. एक-एक करत चारही टीबीएम भुगर्भात सोडण्यात येतील आणि दोन वर्षांने भुयारीकरण पूर्ण करून भुगर्भातून बाहेर येतील. एकूणच प्रकल्पातील भुयारीकरण दोन वर्षांत, तर संपूर्ण प्रकल्प २०२९-३० मध्ये पूर्ण होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दुहेरी बोगद्यामुळे ठाणे – बोरिवलीदरम्यानचे अंतर केवळ १२ मिनिटांवर येईल. ही बाब वाहनचालक – प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक असणार आहे.