ठाकु्ली रेल्वे स्थानका जवळील निर्जन स्थळी एका सतरा वर्षाच्या मुलीवर पोलीस असल्याची बतावणी करुन शुक्रवारी दुपारी बलात्कार करणाऱ्या दोन तरुणांना विष्णुनगर पोलिसांच्या पाच पथकांनी चोवीस तासाच्या आत डोंबिवली, कल्याण मधून अटक केली.विष्णु सुभाष भांडेकर (२५, बिगारी कामगार, गावदेवी चाळ, साईनाथ नगर, नेवाळी नाका, कल्याण पूर्व), आशीष प्रकाशचंद गुप्ता (३२, चहा विक्रेता, रुपाबाई निवास, दत्त चौक, नांदिवली रस्ता, डोंबिवली पूर्व) अशी अटक आरोपींची नावे आहेत. विष्णु सराईत गुन्हेगार आहे. गेल्या वर्षी विष्णुनगर पोलिसांनी त्याला डोंबिवलीतील विजय सोसायटी भागातील आठ लाखाच्या घरफोडी प्रकरणात अटक केली होती.
हेही वाचा >>>ठाणे : ठाकुर्लीत अल्पवयीन मुलीवर तोतया पोलिसांकडून सामूहिक बलात्कार
ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानक भागातील गर्द झाडी भागात डोंबिवली पूर्वेतील बारावीत शिक्षण घेणारी मुलगी आणि तिचा एमआयडीसी भागात राहणारा मित्र शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता फिरण्यासाठी आले होते. आरोपी विष्णु, आशीष यांनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मित्राला धमकावून ‘आम्ही पोलीस आहोत. तुमची आम्हाला चौकशी करायची आहे’ असे दटावणीच्या भाषेत बोलून त्यांना खाडी किनारच्या झुडपांमध्ये नेले. दोघांनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडितीने प्रतिकार केला. तो त्यांनी जुमानला नाही. या प्रकाराचे त्यांनी मोबाईलमध्ये चित्रण करुन हा विषय कुठे काढला तर ती चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. मुलीच्या मित्राला तोतया पोलिसांनी मारहाण करुन पिटाळून लावले होते.
रेल्वे सुरक्षा जवानाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीला येऊन विष्णुनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री पीडित मुलीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला होता. कल्याणचे उपायुक्त सचिन गुंजाळ, उल्हासनगरचे उपायुक्त सुधाकर पाठारे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, मानपाड्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे, साहाय्यक निरीक्षक सुनील तारमळे यांच्या देखरेखीखाली विष्णुनगर, मानपाडा पोलिसांची पाच तपास पथके तयार करण्यात आली.
हेही वाचा >>>कळव्याच्या सहाय्यक आयुक्तांनी घेतले बेकायदा बांधकामधारकाकडून २० लाख रुपये; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंबिवली पूर्व, कल्याण परिसरातून दोन्ही आरोपींना अटक केली. विष्णु भांडेकरच्या चौकशीतून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता भालेराव यांनी व्यक्त केली. पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, राहुल खिल्लारे, उपनिरीक्षक मोहिनी कपिले, दीपविजय भवर, पी. के. आंधळे आणि इतर २५ पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.