डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील जयहिंद काॅलनी भागात राहत असलेल्या एका पती-पत्नीने पुणे, मुंबई, डोंबिवली परिसरातील १४ गुंतवणूकदारांची वाढीव व्याजाचे आमिष दाखवून दोन कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. अमोल कृष्णा डोंगरीकर, पत्नी अनन्या (रा. यमुना छाया सोसायटी, घनश्याम गुप्ते रस्ता, जयहिंद काॅलनी, डोंबिवली) अशी आरोपींची नावे आहेत. मुंबईतील चेंबूर येथे राहणारे ओमप्रकाश सरोया (६५) या सेवानिवृत्ताच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी डोंगरीकर दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मागील पाच वर्षांच्या काळात गुंतवणूकदारांनी डोंगरीकर दाम्पत्याच्या एमएमव्ही कन्सलटन्ट मेघा इंडिया कंपनीत ५० हजार ते ४० लाख रुपयांपर्यंत रकमा गुंतविल्या आहेत. या रकमांवर वाढीव व्याजाचे आमिष डोंगरीकर दाम्पत्याने गुंतवणूकदारांना दाखविले होते. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार ओमप्रकाश सरोया यांचा विश्वास संपादन करून डोंगरीकर यांनी त्यांना त्यांच्या गुंतवणूक कंपनीत २५ लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. दरमहा २५ हजार रुपये व्याज देण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला काही महिने अशाप्रकारे व्याज गुंतवणूकदारांच्या बँक खात्यावर जमा होत गेले. त्यानंतर ओमप्रकाश यांच्या बँक खात्यात व्याज जमा होणे बंद झाले. असाच अनुभव इतर १३ गुंतवणूकदारांना आला. वाढीव व्याज देता येत नसेल तर मूळ रक्कम परत करा म्हणून ओमप्रकाश आणि इतर गुंतवणूकदारांनी डोंगरीकर दाम्पत्याकडे तगादा लावला. विविध कारणे देऊन ते रक्कम परत करण्यास टाळाटाळ करू लागले.
हेही वाचा – कल्याणमध्ये रिकामे सिलिंडर भंगारात विकण्याचा प्रयत्न
डोंगरीकर दाम्पत्य आपली रक्कम परत देणार नाही याची खात्री झाल्याने आणि त्यांनी आपली फसवणूक केल्याने तक्रारदारांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.