अंबरनाथ: अंबरनाथचे शिवसेना (एकनाथ शिंदे ) पक्षाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. खुद्द डॉ बालाजी किणीकर यांनीच याची माहिती दिली असून गेल्या १५ दिवसांपासून याची व्यूव्हरचना केली जात होती. ठाण्याच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून याप्रकरणी चौकशी केली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. मला पोलिसांवर विश्वास असून याप्रकरणाची माहिती आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिल्याचेही डॉ. किणीकर यांनी सांगितले आहे.
राज्यात मस्साजोगच्या सरपंचांची हत्या, कल्याण येथील चिमुकलीचा अत्याचार करून केलेली हत्या आणि परभणीची बिघडलेली परिस्थिती या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले असतानाच आता सत्ताधारी पक्षातील आमदारांच्याच हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. खुद्द आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीच याबाबत लोकसत्ताशी बोलतांना माहिती दिली आहे. काही सूत्रांच्या माध्यमातून माझ्या हत्येचा कट रचला गेला, अशी माहिती मला मिळाली होती. ती माहिती घेऊन मी पोलिसांकडे गेलो होतो. त्यावेळी पोलीस याप्रकरणात आधीपासूनच चौकशी करत असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे डॉ. किणीकर यांनी सांगितले आहे. गेल्या १५ दिवसांपासून हा कट रचला जात होता अशी माझी माहिती आहे, असेही किणीकर बोलताना म्हणाले. मला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे आणि याबाबत मी आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्ण माहिती दिली आहे, असेही किणीकर म्हणाले.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी
या प्रकरणामुळे अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही मोठी नावे येऊ शकतात अशीही शक्यता व्यक्त होते आहे. आमदार डॉ बालाजी किणीकर हे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या प्रचारात स्थानिक शिवसेनेचा एक गट सक्रिय नसल्याची चर्चा होती. त्यांचे पक्षांतर्गत विरोधकही उघडपणे त्यांचा विरोध करताना दिसले होते. त्यामुळे या प्रकरणामुळे स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे.