अंबरनाथ: अंबरनाथ शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या सीताई सदन या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दुचाकी चालवणारा खालीद शेख याला सर्वप्रथम अटक करण्यात आली होती. तर पोलिसांना आव्हान देणारा जितेंद्र पवार या आरोपीलाही पोलिसांनी लोणावळ्यातून अटक केली आहे. हल्ल्यातील दोन्ही आरोपी अटकेत असले तरी हल्ल्याचा हेतू मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. चौकशीअंती याचा उलगडा केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सोमवारी अंबरनाथ पूर्वेतील हुतात्मा चौक ते रेल्वे स्थानक रस्ता भर दुपारी गोळीबार घटनेने हादरला. अंबरनाथ पूर्वेतील या भागात मोठी वर्दळ असते. अनेक नामांकित कंपन्यांचे कार्यालय, बँका, शाळा, मंगल कार्यालय येथे आहेत. येथेच सिताई सदन हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीहून आलेल्या एका आरोपीने प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षारक्षकांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. यावेळी दोन गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणानंतर अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विश्वनाथ पनवेलकर यांनी उघडपणे भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यावर आरोप केले होते. तर सर्व आरोप कथोरे यांनी फेटाळून लावले आणि या प्रकरणी मानहानीचा खटला दाखल करण्याचे स्पष्ट केले होते.
या प्रकरणातील एका आरोपीला अंबरनाथ पोलिसांनी पहिल्याच दिवशी अटक केली होती. मात्र जितेंद्र पवार नामक दुसरा आरोपी फरार होता. धक्कादायक म्हणजे समाज माध्यमांवर आरोपी स्टेटस ठेवून पोलिसांना पकडण्याचे आव्हान करत होता. अखेर पोलिसांनी विविध पथके स्थापन करत जितेंद्र पवार या आरोपीला लोणावळ्यातून अटक केली आहे. बुधवारी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला उल्हासनगर सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी दोन्ही आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हल्ल्याचा हेतू अस्पष्ट
प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी हा हल्ला नेमका कशासाठी झाला त्या मागचा हेतू काय होता हे मात्र अद्याप पोलिसांनी स्पष्ट केले नाही लवकरच अधिक तपास करत याबाबतचा खुरासा केला जाईल अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.