कल्याण – मानवी शरीरावर अपाय करणाऱ्या, सरकारने प्रतिबंधित केलेल्या औषधाच्या साठ्यासह दोन जणांना पोलीस उपायुक्तांच्या अवैध धंद्यावर कारवाई पथकाने अटक केली आहे. हे दोघेही कल्याणमधील भोईवाडा, कोनगाव मधील रहिवासी आहेत. या दोघांनी ही प्रतिबंधित औषधे आणली कोठून, ते ही औषधे कोणाला विकणार होते, या दिशेने बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या अवैध धंद्यांवर कारवाई पथकाचे हवालदार राजेंद्र सोनवणे यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात या दोन इसमांविरुध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने, घातक प्रतिबंधित औषधांची विक्री कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> ठाणे पुर्व सॅटीसवरील व्यापारी संकुल दिड वर्षात खुले होणार; व्यापारी संकुलातील आठ मजले रेल्वे देणार भाड्याने
कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी विविध प्रकारची पथके स्थापन केली आहेत. अवैध धंद्यांवर कारवाई पथक एक स्थापन करण्यात आले आहे. चार दिवसापूर्वी अवैध धंद्यांंवर कारवाई पथक कल्याण शहरात रात्रीच्या वेळेत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना कल्याण पश्चिमेतील बैलबाजारातील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती भागातील फोर्टिस रुग्णालय रस्त्यावर एके ठिकाणी दोन इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलीस पथकाला दिसले. पथकाने आपला मोर्चा त्यांच्या दिशेने वळविला. तेवढ्यात ते दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पथकाने दोघांना जेरबंद केले. त्यांच्या जवळच्या सामानाची पोलिसांनी झडती घेतली. त्यामध्ये त्यांना ४० कोडीनयुक्त औषधांच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी या औषधांची माहिती घेतली. त्यांना ही औषधे सरकारने प्रतिबंधित केलेली आणि मानवी शरीरास अपाय करणारी असल्याचे समजले. या औषधांचे उत्पादन हिमाचल प्रदेशात करण्यात आले आहे. या औषधांच्या मुदती डिसेंबर २०२४, नोव्हेंबर २०२६ मध्ये संपणार होत्या.
हेही वाचा >>> कल्याणला एक्सप्रेसमध्ये रात्री गर्दीचा गैरफायदा घेत महिलेचा विनयभंग
पोलिसांनी या दोघांना बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर हवालदार राजेंद्र सोनवणे यांनी सरकारने प्रतिबंधित केलेल्या आणि मानवी शरीरास अपाय ठरणाऱ्या औषधांचा साठा जवळ बाळगला, विक्रीसाठी त्याचा वापर केला म्हणून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल एक ३३ वर्षाची व्यक्ति नोकरदार आहे. ते कल्याण पश्चिमेतील भोईवाडा भागात सखाराम सोडेवाली चाळ भागात राहतात. एक इसम रिक्षा चालक आहे. ते दुर्गाडी पुलाजवळील कोनगावात राहतात. साहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम राठोड यांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.