– ह प्रभागाने कारवाई करण्याची सूचना
डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीत राहुलनगर मध्ये १० फुटाच्या अरूंद रस्त्याला अडथळा होईल अशा पध्दतीने विकासकांनी भागादारी पध्दतीने दोन सुदाम रेसिडेन्सी, रमाकांत आर्केड इमारती बांधल्या आहेत. या दोन्ही इमारतीच्या विकासकांनी पालिकेच्या नगररचना विभागाच्या परवानग्या घेतलेल्या नाहीत. त्यामुळे या बेकायदा इमारतींवर प्रभागस्तरावर साहाय्यक आयुक्तांनी कारवाई करावी, असा अहवाल नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिला आहे.
या अहवालामुळे ह प्रभागावरील या दोन्ही बेकायदा इमारती तोडण्याची जबाबदारी वाढली आहे. डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर रस्त्यावर राहुलनगरमध्ये गेल्या वर्षभरात भूमाफियांनी कल्याण डोंंबिवली पालिका नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता १० फुटाच्या अरूंद खासगी रस्त्याला बाधा येईल अशा पध्दतीने सुदाम रेसिडेन्सी, रमाकांत आर्केड या इमारती बांधल्या आहेत. या इमारतींना सार्वजनिक पोहच रस्ता, जलमल निस्सारणाच्या सुविधा नाहीत. या इमारतींचा वापर सुरू झाला तर मलनिस्सारणाचे सर्व पाणी रस्त्यावर वाहून येणार आहे. या इमारतींना पुरेसी वाहनतळाची सुविधा नाही. या भागात कोंडी होणार असल्याने या दोन्ही बेकायदा इमारतींविषयी नागरिकांनी पालिकेच्या ह प्रभागात तक्रारी केल्या होत्या.
हेही वाचा >>> कर्जत जवळील केळवली रेल्वे स्थानकात दुचाकीवरून प्रवास
तक्रारी प्राप्त होताच ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांनी राहुलनगर मधील भूमाफियांना इमारत बांधकामाची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. माफियांनी आपल्या इमारती खासगी जमिनीवर बांधल्या आहेत. त्यांना बांधकाम परवानगी देऊन त्या नियमित कराव्यात, असे प्रस्ताव नगररचना विभागात दाखल केले होते. या प्रस्तावामुळे ह प्रभागाने या दोन्ही इमारतींवरील कारवाई मागील चार महिने थांबवली होती.
भूमाफियांच्या प्रस्तावानंतर नगररचना विभागाचे नगररचनाकार शशिम केदार, सर्वेअर बाळू बहिरम यांनी राहुलनगर मधील नियमितीकरणाचे प्रस्ताव दाखल सुदाम रेसिडेन्सी, रमाकांत आर्केड इमारतीचीं पाहणी केली. त्यांना या इमारतींना सामासिक अंतर नसल्याचे, रस्त्याला बाधा येईल अशा पध्दतीने या बेकायदा इमारती नियमबाह्यपणे उभारल्या असल्याचे निदर्शनास आले. नगररचना विभागाने या दोन्ही इमारतींंना बांधकाम परवानगी देण्याचे आणि नियमितीकरणाचे प्रस्ताव फेटाळून लावले.
हेही वाचा >>> २५ जानेवारीला सर्व बाजार समिती राहणार बंद – एपीएमसी प्रशासन
तसेच, ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त करपे यांना नगररचना विभागाने पत्र पाठवून राहुलनगर मधील सुदाम रेसिडेन्सी, रमाकांत आर्केड इमारती बेकायदा असल्याचे कळविले आहे. या दोन्ही बेकायदा संकुलांमधील सदनिकांची माफियांनी विक्री सुरू केली आहे. ३० लाखापासून ते ४५ लाखापर्यंत घरे विकून माफिया खरेदीदारांची इमारत अधिकृत असल्याचे सांगून फसवणूक करत आहेत.
ह प्रभागातील राहुलनगर मधील सुदामा रेसिडेन्सी, रमाकांत आर्केड या दोन्ही इमारती बेकायदा आहेत. त्यांचे नियमितीकरणाचे प्रस्ताव नगररचना विभागाने फेटाळले आहेत. ह प्रभागाने याविषयी कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे.
शशिम केदार- नगररचनाकार.
राहुलनगर मधील बेकायदा इमारतींचा वीज, पाणी पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही केली आहे. पोलीस बंदोबस्त मिळाल्या की या दोन्ही इमारती भुईसपाट केल्या जातील. स्नेहा करपे- साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.