लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांविषयी समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह लिखान केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्याविरोधात २४ तासांत ठाण्यात दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली तर भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाख करण्यात आहे. रोशनी यांनी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला होता. परंतु आता रोशनी यांच्यावर गुन्हे दाखल होऊ लागल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी आहेत. कासारवडवली भागातील एका खासगी कंपनीत त्या काम करतात. सोमवारी रात्री त्या कामावर असताना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्ता त्यांच्या कामाच्या ठिकाणी आल्या. त्यावळेस या महिलांनी मारहाण केल्याचा आरोप रोशनी यांनी केला. या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस प्रशासनावर आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांनी पोलीस ठाण्याबाहेरही ठिय्या मांडला होता. मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाकडूनही उद्धव ठाकरे, खासदार राजन विचारे यांच्याविरोधात आरोप करण्यात आले. त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.
आणखी वाचा- ठाकरे गटातील युवती सेनेच्या पदाधिकारीला मारहाण केल्याचा दावा, शिंदे गटाने आरोप फेटाळले
मंगळवारी रात्री याप्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. तर दुसरीकडे मंगळवारी दुपारी शिंदे गटाचे पदाधिकारी दत्ताराम गवस यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात रोशनी विरोधात तक्रार केली. रोशनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह संदेश लिहील्याचे त्यांनी म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे कासारवडली पोलिसांनी रोशनी विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच भाजपचे माजी नगरसेक संजय वाघुले यांनीही रोशनी विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.