ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात गोवर आजाराचे रुग्ण आढळून येत असतानाच, सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या भिवंडी शहरात गोवर संशयित आजाराच्या दोन मुलांचा मृत्यु झाल्याची बाब समोर आली आहे. त्यापैकी एकाचा गोवरमुळे मृत्यु झाल्याची बाब शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालतून पुढे आली आहे तर, दुसऱ्या मुलाचा मृत्युचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भिवंडी शहरात दररोज १० ते १२ गोवर संशयित आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने शहराची आरोग्यचिंता वाढली आहे. त्यातुलनेत जिल्ह्याच्या इतर शहरांमध्ये मात्र गोवर आजाराची रुग्ण संख्या आटोक्यात असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>ठाणे: कार घेऊन दरोडा करण्यासाठी आलेल्यांचा प्रयत्न फसला

भिवंडी शहरात यंदाच्या वर्षभरात गोवर आजाराचे ३४१ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये २११ रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीकरीता मुंबई येथील हाफकीन रिसर्च इन्स्टीट्यूट येथे पाठविण्यात आले असून त्यापैकी ४४ रुग्ण हे गोवर रुबेला बाधीत असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. रुग्ण बाधीत क्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण सुरू केले असून त्यात गोवर बाधीत आढळून आलेल्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांनी गोवर रुबेलाचा एकही डोस घेतलेला नसल्याचे समोर आले आहे. गोवर संशियत रुग्णांपैकी दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यापैकी एका १४ महिन्यांच्या मुलीवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तर ६ महिन्याच्या मुलीवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथे उपचारादरम्यान दोघींचा मृत्यु झाला आहे. या वृत्तास भिवंडी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी बुशरा सय्यद यांनी दुजोरा दिला आहे. एका मुलीची गोवरमुळे मृत्यु झाल्याची बाब शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालतून पुढे आली आहे तर, दुसऱ्या मुलीचा मृत्युचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच घरोघरी सुरु असलेल्या सर्व्हेक्षण दररोज १० ते १२ गोवर संशियत आजाराचे रुग्ण आढळून येत असून शहरात लसीकरण मोहिम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>चार महिन्यात १९५ कोटी मालमत्ता कर वसुलीचे आव्हान ;‘कडोंमपा’ची मागील आठ महिन्यात १८० कोटी वसुली

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये वर्षभरात गोवर आजाराचे १८५ संशयित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १८५ रुग्णांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथील हाफकीन रिसर्च इन्स्टीट्यूट येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात गोवरचे २८ तर रुबेला गोवरचे ५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी आक्टोबर महिन्यात १४ गोवरचे आणि पाच रुबेला गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. तर नोव्हेंबर महिन्यात २ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. बहुतांश रुग्ण हे मुंब्रा-कौसा भागातील असल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. राणी शिंदे यांनी दिली. गेल्या आठवड्यात बदलापूर शहरात गोवर संशयीत दोन मुले आढळली होती. मात्र ते बाधित नव्हते, अशी माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कै. दुबे रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी दिली आहे. तर अंबरनाथ शहरात दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या एका संशयित रूग्णाचे नमुने परिक्षणासाठी पुढे पाठवण्यात आल्याची माहिती डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हरेष पाटोळे यांनी दिली आहे. उल्हासनगर शहरात अद्याप एकही गोवरचा रूग्ण किंवा संशयित आढळला नसल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिली आहे. कल्याण-डोंबिवली शहरातही एकही बाधीत रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन संशयित आणि तीन बाधीत रुग्ण आढळले असून तेही भिवंडी ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two children died of suspected measles in bhiwandi amy
First published on: 21-11-2022 at 17:25 IST