लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील पांडुरंगवाडी भागात गावठी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या इसमाच्या माहितीवरुन पोलिसांनी साताऱ्यातून आणखी एका गुंडाला अटक केली. ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
परशुराम करवले (२३, रा.कृ्ष्णाई घाट, सोमवार पेठ, कऱ्हाड, सातारा), अक्षय जाधव (२४, रा. मायनी, ता. खटाव, सातारा) अशी आरोपींची नावे आहेत. पिस्तुलांची किंमत ५० हजार रुपये आहे. डोंबिवलीतील पांडुरंगवाडी मध्ये एक इसम पिस्तुल विकण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना मिळाली.
हेही वाचा… कल्याणमध्ये इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह भाष्यावरुन तरुणाला मारहाण करुन धिंड काढली
साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, राजकुमार खिल्लारे, यल्लप्पा पाटील यांच्या पथकाने पांडुरंगवाडी भागात सापळा लावला. या भागातील एका हाॅटेलजवळ एक तरुण हातात पिशवी घेऊन संशयास्पदरित्या फिरत असल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक खिल्लारे यांना दिसले. त्यांनी त्या तरुणाला हटकले. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पथकाने त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणून अंगझडती घेतली त्याच्याकडे गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुसे आढळली.
हेही वाचा… सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर मंगळवारी चर्चासत्र, विद्यमान सरकार घटनाबाह्यच- आनंद परांजपे
परशुराम करवले अशी त्याने ओळख करुन दिली. अशाच प्रकारचे पिस्तुल त्याने सातारा येथील अक्षय जाधवला विकले असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी परशुरामच्या माहितीवरुन सातारा येथून अक्षयला पिस्तुलासह अटक केली. पोलीस तपासात हे दोघे सराईत गु्न्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर साताऱ्यातील वडुज, कऱ्हाड, सातारा पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र विक्री, वाळू चोरीचे गुन्हे दाखल आहेत, असे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले.