डोंबिवली एमआयडीसीतील सोनारपाडा येथील अमुदान कंपनी स्फोटात जळून खाक झालेल्या दोन मृतदेहांची ओळख बारा दिवसांनी पटली आहे. नातेवाईकांच्या डीएनए चाचणीवरून ही ओळख पटविण्यात आली आहे. विशाल पौडवाल (४०), मनीष दास (२२) अशी ओळख पटलेल्या कंपनी कामगारांची नावे आहेत.

अमुदान कंपनीत स्फोट झाल्यानंतर ते मागील बारा दिवसांपासून बेपत्ता होते. या स्फोटातील मृतदेह पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. या मृतदेहांंचा कोळसा झाला असल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड झाले आहे. समोर मृतदेह आहेत पण तो आपल्या नातेवाईकाचा आहे हे कसे समजायचे असे प्रश्न कुटुंबीयांना पडले आहेत. जोपर्यंत आपल्या मयत कामगाराची ओळख पटत नाहीत तोपर्यंत नातेवाईक पोलीस ठाण्यात, पालिका रुग्णालयात फेऱ्या मारत आहेत.

हेही वाचा >>> ठाणे : शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के म्हणतात, हा आहे नवा ‘हिंदुस्थान…

स्फोट झाल्यानंतर अनेक मृतदेहांची ओळख पटली नाही. पालिका रुग्णालयात ज्या नातेवाईकांचे कामगार बेपत्ता आहेत. त्यांचे रक्ताचे नमुने घेऊन ते डीएनए चाचणीसाठी फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविले होते. असे नुमने घेतलेल्या विशाल पौडवाल, मनीष दास यांचे त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच्या रक्ताचे नमुने जुळले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. यासंदर्भातची माहिती कल्याण पोलिसांनी या दोन्ही कुटुंबीयांना देण्यात आली. पौडवाल, दास यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात अंत्यविधीसाठी देण्यात आले.

हेही वाचा >>> कल्याणमधील शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी

पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी डीएनए चाचणीवरून दोन मृतदेहांची ओळख पटली असल्याचे सांगितले. विशाल पौडवाल हे बदलापूर येथे पत्नी आणि आपल्या आठ वर्षाच्या मुलासह राहत होते. ते अमुदान कंपनी लगतच्या कॉसमॉस कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होते. मनीष दास हेही कॉसमॉस कंपनीत गेल्या महिन्यापासून कामाला होते.

या स्फोटात रोहिणी कदम (२६), रिध्दी खानविलकर (३८), राकेश राजपूत (२७) हे मरण पावले होते. त्यांची ओळख यापूर्वीच पटविण्यात आली आहे. त्यामुळे अमुदान कंपनी स्फोटतील आतापर्यंत पाच मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आहे. अद्याप सात मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात ओळख पटत नसल्याने संंरक्षित करून ठेवण्यात आले आहेत. ज्या कुटुंबीयांचे कामगार सदस्य बेपत्ता आहेत. त्यांच्या रक्त नमुने चाचण्या यापूर्वीच घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे फोरेन्सिक प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर या सात मृतदेहांची ओळख पटण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कंपनी स्फोटानंतर परिसरात सापडलेले कामगारांचे विविध प्रकारचे २६ अवयव चाचण्यांसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. हे अहवाल आल्यानंतर उर्वरित बेपत्ता कामगार, मृतदेह यांची ओळख पटविणे शक्य होणार आहे, असे डॉ. शुक्ला यांनी सांगितले.

Story img Loader