मुंबई नाशिक महामार्गावर शुक्रवारी दुपारी भरधाव रिक्षा रस्त्यामधील दुभाजकाला धडकल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. सतीश जाधव (४५) आणि किशोर पाटील (४४) अशी मृतांची नावे असून तिघे जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचे चित्रीकरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
हेही वाचा >>> कल्याण डोंबिवलीसाठी अलर्ट… मंगळवारी पाणीपुरवठा बंद रहाणार
मुंबई नाशिक महामार्गावरील पडघा भागातून रिक्षा चालक भिवंडीच्या दिशेने येत होता. या रिक्षामध्ये चालकासह पाचजण प्रवास करत होते. रिक्षा भरधाव असताना एक दुचाकीस्वार छेद रस्त्यातून दुचाकी घेऊन जात होता. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेकडील मार्गावर गेली. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा चुराडा झाला. पाचही जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रिक्षामधील सतीश आणि किशोर या दोघांचा मृत्यू झाला. तर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.