लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : येथील गावदेवी बस थांब्याच्या आवारात पडलेले झाड कापून बाजूला करण्याचे काम करीत असलेल्या दोन अग्निशमन कर्मचाऱ्यांना भटक्या श्वानाने चावा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
ठाणे येथील गावदेवी मैदानाच्या बाजूला असलेल्या बस थांब्याच्या परिसरात बुधवारी रात्री झाड पडले. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन झाड बाजूला करण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी झाड कटिंगचे काम करत असताना, त्या ठिकाणी असलेला भटका श्वान दोघांनाही चावला. यामुळे दोघांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
आणखी वाचा-कल्याण डोंबिवली पालिकेतील ३६३६ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजेनेचा लाभ?
घटनास्थळी पडलेल्या झाडाचा धोकादायक भाग आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कापून बाजूला केला आहे. घटनास्थळी उर्वरित झाड बाजूला करण्याचे काम वृक्षप्राधिकरण विभागामार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून देण्यात आली.