कल्याण येथील एका लाॅजवर छापा टाकून ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दोन सतरा वर्षाच्या मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केली. दीड लाख रुपयांचा व्यवहार करून दोन महिलांनी त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले होते. त्या दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
अंजू नंदकिशोर सिसोदिया (३५, रा. नवी मुंबई), सरीता कृृपालिनी सिसोदिया (३५) असे देहव्यापारातील मध्यस्थ आरोपी महिलांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना कल्याण मधील रेल्वे स्थानका जवळील अनिल पॅलेस नंबर एक लाॅजिंग व बोर्डिंग मध्ये दोन मुलींना दोन महिलांकडून वेश्या व्यवसायात जबरदस्तीने लोटले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी या महिलांना अटक केली. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींची महिलांच्या तावडीतून सुटका केली.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये मालकाने वेतन थकविल्यामुळे चिंताग्रस्त कामगाराची आत्महत्या
अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागातील हवालदार मीनाक्षी खेडेकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण, अनैतिक व्यापार, बाल न्याय संरक्षण कायद्याने गुन्हे दाखल केले आहेत.