डोंबिवली – कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात महिला, पुरूष पादचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी असा ऐवज हिसकावून पळून जाणाऱ्या आंबिवली, शहाड येथील दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या चोरट्यांकडून आठ लाख ६८ हजाराचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये १५१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक पल्सर दुचाकी वाहनाचा समावेश आहे. वारीस मिराज खान (२४, रा. अटाळी, कल्याण), मोहम्मद जाफर कुरेशी (३०, रा. शहाड) अशी आरोपींची नावे आहेत.
साहाय्यक आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले, गेल्या आठवड्यात मानपाडा रस्ता भागात राहणारे एक शिक्षक रवी गवळी सकाळच्या वेळेत डी मार्ट भागातील रस्त्यावर फिरत होते. पायी जात असताना अचानक त्यांच्या पाठीमागून एक दुचाकी आली. त्या दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या इसमाने गवळी यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून दुचाकीसह पळ काढला. मानपाडा पोलीस ठाण्यात गवळी यांनी तक्रार केली होती.
हेही वाचा >>> भाजपा नेत्यांची पाठ फिरताच डोंबिवलीतील फडके रस्त्याला फेरीवाल्यांचा विळखा, रस्त्याच्या दुतर्फा रस्ते अडवून ठेले
पोलिसांनी घटना घडल्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही चित्रण तपासले. चोरट्यांची ओळख पटविल्यानंतर ते इराणी वस्ती भागातील रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले. हे चोरटे शुक्रवारी नवी मुंबईतून तळोजा मार्गे डोंबिवलीत येणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी काटई-बदलापूर रस्त्यावरील तळोजा वळण रस्ता येथे निसर्ग हाॅटेलच्या जवळ सापळा लावला. ठरल्या वेळेत आरोपी तेथे दुचाकीवरून येताच पोलिसांनी मुदाम या भागातील रस्त्यावर मालवाहू अवजड वाहने अडवून ठेवली. दुचाकी स्वार या वाहन कोंडीत अडकून ते पळून जाणार नाहीत, असे पोलिसांना वाटले. परंतु आपणास पोलिसांनी घेरले हे समजातच दोन्ही चोरटे रस्त्यावर दुचाकी सोडून पळू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांनी डोंबिवली, कल्याण मधील मानपाडा, रामनगर, महात्मा फुले पोलीस ठाणे, विष्णुनगर, कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपींकडून आठ लाख ६८ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश मदने, सुनील तारमळे, अनिवाश वनवे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास काटकर यांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली.