कल्याण– कल्याण डोंबिवली पालिकेने अर्धवट तोडलेले बेकायदा बांधकाम पुन्हा तोडण्यावरुन येथील सापर्डे गावात गुरुवारी सकाळी दोन गटात जोरदार राडा झाला. या दोन्ही गटांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात एकमेकांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.पोलिसांनी सांगितले, सापर्डे गावात भगवान बाळाराम पाटील यांनी कल्याण डोंबिवली पालिकेची बांधकाम परवानगी न घेता एका बेकायदा बांधकाम केले होते. ते पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अर्धवट स्थितीत तोडले होते.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील दत्तनगरमधील अपात्र लाभार्थींना ‘झोपु’ योजनेतील घरे वाटपास न्यायालयाची स्थगिती
या अर्धवट तोडलेल्या कामाच्या भिंती याच गावातील रुपेश पाटील, हरेश पाटील, रमेश पाटील, विश्वास पाटील, हितेश पाटील, जयेश पाटील, संगीता भोईर यांनी जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकल्या. हे अर्धवट बांधकाम का तोडून टाकले याचा जाब विचारण्यासाठी भगवान पाटील यांची विवाहित मुलगी भावना भोईर पाटील बंधूंच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी रमेश पाटील यांनी तक्रारदार भावना यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भावना भोईर यांनी पाटील बंधूंविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
हेही वाचा >>> ठाणे, डोंबिवली, कल्याण मध्ये महिलांच्या गळ्यातील ऐवज लुटणारे टिटवाळ्यात अटक
याच प्रकरणात सुनीता पाटील यांनी भावना महेंद्र भोईर, महेंद्र भोईर व वीटभट्टीवर काम करणार पाच कामगार यांच्या विरुध्द खड़कपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी सांगितले, सुनीता पाटील, पुतण्या विश्वास पाटील शेतावर जात होते. भावना भोईर यांच्या शेतामधील जुन्या वहिवाट रस्त्यावरुन जात असताना भावना भोईर, कुंदा भोईर, मधुकर भोईर व पाच वीटभट्टी कामगारांनी त्यांचा रस्ता अडविला. त्यानंतर भावना भोईर यांनी सुनीता यांच्या घरासमोर येऊन त्यांना शिवीगाळ केली. आमच्या शेतामधील दगडी कुंपण तोडले तर आम्ही तुमच्या मुलाच्या विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करू. येत्या यात्रे पर्यंत मुलाला गायब करून टाकण्याची धमकी दिली. या दोन्ही परस्परविरोधी गुन्ह्यांचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल खोंडे, उपनिरीक्षक ए. एम. जाधव करत आहेत.