कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या सुवर्णा सरोदे (२६) या महिलेचा सिझरिन शस्त्रक्रिया केल्यानंतर मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. या महिलेच्या मृत्यूप्रकरणी बाह्यस्त्रोत संस्थेच्या माध्यमातून शास्त्रीनगर रुग्णालयात कार्यरत असलेल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. मीनाक्षी केंद्रे, स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. संगीता पाटील यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका उपायुक्त प्रसाद बोरकर समितीने ठेवला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांचा यासंदर्भातील स्वतंत्र चौकशी अहवाल येईपर्यंत या दोन्ही स्त्रीरोग तज्ज्ञांना कामावरून कमी करणे उचित ठरेल, असे मत समितीने अहवालात नोंदविले आहे.

विधीमंडळ अधिवेशनात आमदार गोपाळराव मते यांनीही शास्त्रीनगर रुग्णालयात सुवर्णा सरोदे या महिलेचा प्रसूृतीनंतर मृत्यू झाल्याने याप्रकरणातील दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. नवी मुंबईतील मेसर्स एमके फॅसिलिटीस सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या बाह्यस्त्रोत संस्थेतून शास्त्रीनगर रुग्णालयात कार्यरत असलेल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. मीनाक्षी केंद्रे या घटनेच्या दिवशी रुग्णालयात कर्तव्यावर होत्या, पण त्या रुग्णालयात उपस्थित नव्हत्या. स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. संगीता पाटील यांनी सुवर्णा सरोदे यांच्यावर सिझरिनची शस्त्रक्रिया केली होती. दुसऱ्या शस्त्रक्रियेच्यावेळी त्या रुग्णालयात उपस्थित होत्या. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात उपस्थित राहणे उचित ठरले असते, असे निष्कर्ष उपायुक्त बोरकर समितीने काढले आहेत.
हा प्राथमिक चौकशी अहवाल आयुक्त डॉक्टर इंदूराणी जाखड यांना सादर करण्यात आला आहे.

पालिका प्रशासनाने बाह्यस्त्रोत संस्थेकडून पालिकेत काही तज्ज्ञ डाॅक्टरांची भरती केली आहे. मेसर्स एमके फॅसिलिटीस सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या बाह्यस्त्रोत संस्थेमधील डाॅ. पाटील, डाॅ. केंद्रे या कर्मचारी आहेत. उपायुक्त बोरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल, डाॅ. सादिया पिंजारी, डाॅ. प्रियांका पाटील, डाॅ. समीर सरवणकर यांचा समावेश आहे. सुवर्णा यांचा प्रसूतीनंतर रुग्णालयात मृत्यू झाल्याने अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशावरून ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. जिल्हा शल्य चिकित्सक यांची समितीही याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत आहे. या प्रकरणाची चौकशी करताना बोरकर समितीने पालिकेच्या पॅनलवरील विशेषज्ञ डाॅ. नीलेश शिरोडकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. योगेश चौधरी, डाॅ. केंद्रे, डाॅ. पाटील, डाॅ. पूजा राठोड, डाॅ. प्राजक्ता लांडगे, परिचारिका, रुग्णसेवक अशा एकूण २१ कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले आहेत.

घटनेचा क्रम

गेल्या महिन्यात मोठागावमध्ये राहणाऱ्या सुवर्णा सरोदे प्रसूतीसाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यांची पहिली सिझरिन झाली होती. त्यामुळे त्यांची दुसऱ्यांदा डाॅ. संगीता पाटील यांनी सिझरिनची शस्त्रक्रिया केली. रात्रीच्या वेळी सुवर्णा यांना विविध प्रकारचे त्रास सुरू झाले. डाॅ. मीनाक्षी केंद्रे सुवर्णावर कोणते उपचार करावेत याविषयी दूरध्वनीवरून मार्गदर्शन करत होत्या. रात्री उशिरा सुवर्णा यांची तब्येत खालवली. विशेषज्ञ डाॅक्टरांना पाचरण करण्यात आले. त्यांनी तातडीने शस्त्रक्रिया सुरू केली. रक्तस्त्राव थांबविण्यासाठी गर्भाशय काढण्याचा निर्णय डाॅक्टरांनी घेतला. मध्यरात्री सुवर्णा यांची प्रकृती खालावली त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणाला जबाबदार डाॅक्टरांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत नातेवाईकांनी दोन दिवस रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले होते.

Story img Loader