रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करू नका, असे सतत सांगुनही फेरीवाले दाद देत नसल्याने डोंबिवली पूर्वेत ग प्रभागाच्या फेरीवाला हटाव नियंत्रण पथकाने मागील तीन दिवसाच्या कालावधीत रामनगर, दत्तनगर, सुनीलनगर, शिवमंदिर रस्ता, राजाजी रस्ता भागातील सुमारे २०० हातगाड्या जप्तीची कारवाई केली. अनेक हातगाड्या जागीच तोडून टाकण्यात आल्या, अशी माहिती ग प्रभाग अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी दिली.
डोंबिवली पूर्वेतील ग प्रभाग हद्दीतील रामनगर रेल्वे स्थानक परिसर, राजाजी रस्ता, टंडन रस्ता, दत्तनगर चौक, सुनीलनगर, शिवमंदिर रस्ता, डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्ता हे सर्वाधिक वर्दळीचे भाग आहेत. या रस्त्यांवर पाणीपुरी, वडापाव विक्रेते आणि इतर फेरीवाल्यांनी रस्ता, पदपथ अडवून व्यवसाय करू नयेत म्हणून ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी सर्व फेरीवाल्यांना आदेशित केले होते.
हेही वाचा: ठाणे जिल्ह्यातही हुडहुडी; संपूर्ण आठवड्यात तापमानात घट
वारंवार सांगुनही फेरीवाले दाद देत नसल्याने अखेर अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशावरुन फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई करण्याचा निर्णय ग प्रभाग अधिकाऱ्यांनी घेतला. रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. अनेक फेरीवाल्यांनी लोखंडी गज लावून गाळ्याचे रुप हातगाड्यांना दिले आहे. अशा गाड्या जागीच तोडून टाकण्यात आल्या. आक्रमक पध्दतीने सुरू असलेल्या या कारवाईने फेरीवाल्यांची पळापळ झाली आहे.
या कारवाईमुळे अनेक दिवसानंतर प्रथमच रस्ते मोकळे झाल्याने पादचारी, प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत. कारवाई करताना अनेक फेरीवाले कारवाई पथकातील कर्मचाऱ्यांना दटावणे, दबाव आणून कारवाई रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावरही आक्रमक केली जात आहे, असे साहाय्यक आयुक्त साबळे यांनी सांगितले. कारवाई पथकाने शिवसेना मध्यवर्ति शाखेजवळील हातगाड्या, तसेच मोनिका ॲनेक्स दुकाना समोरील हातगाडी हटविण्याची मागणी पादचारी, वाहन चालकांकडून केली जात आहे. ही हातगाडी वाहतुकीला अडथळा आणत असल्याच्या तक्रारी आहेत.