डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील रेतीबंदर रस्त्यावरील राहुलनगर मध्ये खासगी जमिनींवर कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता सात माळ्याच्या दोन बेकायदा इमारतींची उभारणी जमीन मालकांनी केली आहे. या इमारत कामासाठी या भागातील रस्त्यांवर बांधकामाचा राडारोडा पडला असल्याने परिसरातील नागरिकांना या भागातून येजा करणे अवघड झाले आहे.
मागील काही महिन्यांपासून या खासगी जमीन मालकांनी भूमाफियांनी हाताशी धरुन या दोन बेकायदा इमारतींची उभारणी केली आहे. पालिकेचा लाखो रुपयांचा बांधकाम परवानग्या, अधिभाराचा महसुल चुकविण्यासाठी भूमाफिया बेकायदा बांधकामांना प्राधान्य देत असल्याचे समजते.
हेही वाचा >>> शिवसेना-भाजपाच्या दहीहंड्यांमुळे डोंबिवलीत रस्ते वाहतुकीत बदल
पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाच्या मार्गावर या टोलेजंग बेकायदा इमारती आहेत. परिसरातील रहिवासी या बेकायदा बांधकामांमुळे अस्वस्थ आहेत. पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे शोधण्यासाठी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी कनिष्ठ अभियंता आणि त्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक प्रभागात तीन ते चार बीट मुकादम नेमले आहेत. ह प्रभागातील बीट मुकादम, नियंत्रक कनिष्ठ अभियंता यांना राहुलनगर मधील बेकायदा इमारती दिसल्या नाहीत का, असे प्रश्न राहुलनगर मधील रहिवासी करत आहेत.
या बेकायदा इमारती उभारणाऱ्या भूमाफियांची परिसरात दहशत असल्याने सामान्य रहिवासी या बांधकामाची पालिकेत तक्रार करण्यास घाबरत आहेत. या भागातील काही रहिवाशांनी कल्याण येथील पालिका कार्यालयात संपर्क केला. त्यावेळी आम्ही संबंधितांना ही माहिती देतो, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही, अशी खंत राहुलनगर भागातील रहिवाशांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> ठाणे : शिधापत्रिकाविषयक समस्या महिन्याभरात मार्गी लावा, आमदार संजय केळकर यांच्या शिधावाटप अधिकाऱ्यांना निर्देश
दोन्ही बेकायदा इमारतींमध्ये सुमारे ६० ते ६५ कुटुंब राहण्यास येतील. त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर उभी राहणार आहेत. त्यामुळे या भागातील चिंचोळ्या अरुंद रस्त्यावर कोंडी होण्याची शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली. बनावट दस्तऐवज तयार करुन या दोन्ही बेकायदा इमारतींमधील सदनिका भूमाफियांकडून विकण्याची तयारी करण्यात आली आहे, असे एका माहितगाराने सांगितले. या इमारतींमधील सदनिका सुमारे ३० लाखापासून ते पुढे मिळेल त्या किमतीत विकण्याच्या प्रयत्नात माफिया आहेत. नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी आयुक्तांनी या बेकायदा बांधकामाची गंभीर दखल घेण्याची मागणी राहुलनगर भागातील नागरिकांकडून केली जात आहे.