लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक, पालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त यांच्या दोन स्वतंत्र चौकशी समित्या नेमण्यात आल्या आहेत. या दोन्ही चौकशी समित्यांच्या अहवालाप्रमाणे महिलेच्या मृत्यूप्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी सांगितले.

प्रसूतीदरम्यान महिलेच्या मृत्यू प्रकरणात काही हलगर्जीपणा झाला आहे का, याविषयीची चौकशी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक करतील. शुक्रवार संध्याकाळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट देऊन याप्रकरणातील कागदपत्रे, माहिती घेऊन चौकशीला सुरूवात केली आहे. या मृत्यू प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई झाली आहे का, याविषयीची चौकशी पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त करणार आहेत. हे दोन्ही अहवाल प्राप्त झाल्यानंतर या दोन्ही अहवालांदरम्यान याप्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर पालिका आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे, असे डॉ. शुक्ला यांनी सांगितले.

मंगळवारी संध्याकाळी साडे पाच वाजता सुवर्णा सरोदे ही महिला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेची पहिली प्रसूती सिझेरिनद्वारे झाली असल्याने दुसऱ्या खेपेची प्रसूती सिझेरिनद्वारे करण्याची डॉक्टरांची निश्चित केले. बुधवारी दुपारी १२ वाजता सुवर्णा यांची सिझेरिनव्दारे प्रसूती करण्यात आली. यावेळी आई, बाळाची प्रकृती स्थिर होती. त्यांना रुग्ण कक्षात हलविण्यात आले. बुधवारी रात्री सुवर्णा यांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या मार्फत पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर योग्य उपचार सुरू करण्यात आले. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता सुवर्णा यांची प्रकृती पुन्हा खालावण्यास सुरूवात झाली. उपचार सुरू असतानाच त्यांचा गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी दिली आहे.

Story img Loader