लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: एक्सप्रेस, लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर काठी, लोखंडी सळईचा फटका मारायचा. फटक्याने प्रवाशाच्या हातामधील पैशाची पिशवी, मोबाईल रेल्वे मार्गात पडला की ती वस्तू उचलून पळून जायचे. अशा प्रकारची लुटमार करणाऱ्या दोनजणांना कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी आंबिवलीमधील इराणी वस्तीमधून रविवारी अटक केली.
मोहम्मद अब्बास समीर सय्यद (१९), मोहम्मद अली हुमायुन जाफरी (१०) अशी अटक सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. ते आंबिवलीतील इराणी वस्तीत राहत होते. मागील काही महिन्यांपासून कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान दिवसा, रात्री एक्सप्रेस, लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर काठी, लोखंडी सळईने हातावर जोराने फटका मारून त्यांच्या हातामधील वस्तू रेल्वे मार्गात पडली की त्या प्रवाशाच्या समोर उचलून भुरटे चोर पळून जात होते.
हेही वाचा… डोंबिवलीतील कुटुंबाला देवदर्शन पडले महागात, घरात ३९ लाखांची चोरी
लोकल, एक्सप्रेस धावती असल्याने प्रवाशांना त्या वस्तूकडे बघण्याव्यतिरिक्त चोरांना पकडण्याची कोणतीही कृती करता येत नव्हती. अशा भुरट्या चोरीच्या अनेक तक्रारी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. या वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, रेल्वे सुरक्षा बळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शर्मा यांच्या नेतृत्वाखाली २५ हवालदारांच्या पथकाने मागील काही दिवस कल्याण, आंबिवली, शहाड, टिटवाळा रेल्वे मार्गाच्या दुतर्फा सापळा लावला होता. साध्या वेशात पोलीस या भागात गस्त घालत होते.
हेही वाचा… भिवंडी दुर्घटना; मृतांची संख्या सहा
शनिवारी, रात्री आंबिवली परिसरात पोलिसांनी रेल्वे मार्गालगत फिरणाऱ्यांची धरपकड मोहीम सुरू केली होती. ही मोहीम सुरू असताना एक टोळके रेल्व मार्गाजवळ उभे होते. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा करताच ते पळू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून आरोपी जाफरी, सय्यद यांना अटक केली. त्यांचे तीन साथीदार रेल्वे मार्गालगतच्या झुडपांचा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
या दोन्ही लुटारूंनी रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लुटल्याची कबुली दिली आहे. तीन फरार आरोपींचा रेल्वे पोलीस शोध घेत आहेत. मागील काही महिन्यांपासून आंबिवली, टिटवाळा दरम्यान रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारणाऱ्या लुटारूंना अटक केल्याने हे गुन्हे थांबण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढगे यांनी व्यक्त केली.