डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानका जवळील सिध्दार्थ नगर झोपडपट्टी भागात बुधवारी संध्याकाळी रेल्वेची जुनी आठ फूट उंचीची संरक्षक भिंत कोसळून याठिकाणी नवीन संरक्षक भिंत उभारणीचे काम करणारे सात मजूर भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यामधील पाच जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. एक जण जागीच ठार झाला. एक जण अत्यवस्थ होता. पालिका रुग्णालयात उपचार सुरू असताना तो मयत झाला.
हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात पीसीवी लशींचा तुटवडा ; हजारो बालके लसीकरणापासून वंचित
बंडू पोवासे (३०), मल्लेश चव्हाण (३५) हे कामगार जागीच ठार झाला. माणिक पवार, विनायक चौधरी, युवराज गुत्तवार, मल्लेश हे कामगार जखमी झाले आहेत. साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले, कोपर पुला जवळ सिध्दार्थ नगर झोपडपट्टी जवळ रेल्वेने अतिक्रमण टाळण्यासाठी नवीन संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू केले आहे. या कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी याच भागात जुन्या संरक्षक भिंती जवळ एका निवाऱ्याखाली सिमेंट, वाळू, आवश्यक बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे. या निवाऱ्यात एकूण १२ मजूर कामगार राहतात. ते भिंत उभारणीचे काम करतात. हे सगळे कामगार ३० ते ३५ वयोगटातील आहेत.
हेही वाचा >>> कल्याण जवळ रस्ते अपघातात मरण पावलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना ३५ लाखाची भरपाई
बुधवारी संध्याकाळी धोकादायक जुन्या संरक्षक भिंतीच्या भागात नवीन संरक्षक भिंत उभारणीचे काम सात मजुरांच्या उपस्थितीत सुरू होते. जुन्या भिंती जवळ उभे राहून काम करत असल्याने अचानक जुनी धोकादायक संरक्षक भिंत कोसळली. या भिंतीच्या जवळ उभे असलेले सात कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. भिंत कोसळताच मोठा आवाज झाला. झोपडपट्टी भागातील नागरिकांनी गाडल्या गेलेल्या पाच जणांना तात्काळ बाहेर काढले. ढिगारा मोठा असल्याने त्याखाली कोण आहे हे नागरिकांना समजले नाही. मोठा ढीग अंगावर पडल्याने एक कामगार जागीच ठार झाला. एक जण अत्यवस्थ होता. तो नंतर मरण पावला, असे पोलिसांनी सांगितले.घटनास्थळी रेल्वे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस दाखल झाले आहेत. अग्निशमन जवानांकडून ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. कामगारांची कुटुंब कोपर पुल परिसरात राहत होती. त्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात टाहो फोडला आहे. जखमींवर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.