ठाणे : ठाणे जिल्ह्यात १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दोन लाख ३७ हजार ८३४ वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे. २०२३ मध्ये याच कालावधीत दोन लाख नऊ हजार ५०५ वाहनांची नोंद झाली होती. वाहनांमध्ये सर्वाधिक विक्री दुचाकी आणि मोटारींची (कार) झाली आहे. तर सर्वाधिक नोंदणी ठाणे, मिरा भाईंदर आणि भिवंडी या शहरात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. असे असले तरी पायाभूत सुविधा आणि रस्त्यांची क्षमता तुलनेने वाढलेली नाही. ठाणे जिल्ह्यातून नोकरदार त्यांच्या वाहनाने मुंबई किंवा इतर कामाचे ठिकाण गाठत असतात. तसेच अवजड वाहनांची वाहतुक शहरातून होत असते. त्यामुळे वाहनांचा भार शहरातील रस्त्यांवर आला आहे. दुसरीकडे वाहन नोंदणीचे प्रमाणही जिल्ह्यात वाढत आहे. वाहने वाढत असताना कोंडीचा सामना देखील नागरिकांना सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीत चार ते पाच जणांच्या कुटुंबामध्ये दोन ते तीन वाहने खरेदी होऊ लागली आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागात वाहन नोंदणीचे प्रमाणही वाढत आहे.

हेही वाचा…ठाण्याचा विकास आराखडा निवडणुकांमुळे पडद्याआड? दोन महिन्यांत जेमतेम ६०० हरकती

जिल्ह्यात तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. यामध्ये ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभाग क्षेत्रात ठाणे, मिरा भाईंदर आणि भिवंडी, कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागात डोंबिवली ते बदलापूर आणि वाशी उपप्रादेशिक परिवहन विभागात नवी मुंबई शहर येते. या तिन्ही विभागात यावर्षी म्हणजेच, १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दोन लाख ३७ हजार ८३४ इतक्या वाहनांची नोंद झाली. यात ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागात एक लाख १६ हजार ६७३, कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागात ८२ हजार १७४, वाशी उपप्रादेशिक परिवहन अर्थात नवी मुंबई शहरात ३८ हजार ९८७ वाहनांची नोंद झाली आहे. तर २०२३ मध्ये याच कालावधीत ठाणे विभागात एक लाख दोन हजार ३६८, कल्याण विभागात ७१ हजार ७८० आणि वाशी विभागात ३५ हजार ३५७ वाहनांची नोंद झाली आहे.

सर्वाधिक वाहनांची नोंदणी दुचाकी आणि मोटारींची झाली आहे. ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागात ७५ हजार ५३६ दुचाकी आणि २१ हजार २८६ मोटारींची नोंदणी झाली. कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागात ५९ हजार ३९२ दुचाकी आणि १३ हजार ३८८ मोटारी तर वाशी उपप्रादेशिक परिवहन विभागात नऊ हजार ६८९ मोटारी आणि १९ हजार ५२ दुचाकींची नोंदणी झाली.

हेही वाचा…रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या वृद्धेला रिक्षाची धडक

देशात वाहनांची नवी उत्पादने आल्यास ते उत्पादन खरेदीसाठी नागरिकांचा कल असतो. तसेच काहीजणांना वाहने खरेदीची हौस असते. त्यामुळे वाहन नोंदणीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. – हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two lakh 37 thousand 834 vehicles registered with thanes regional transport department this year sud 02