लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: पावसाचे प्रमाण कमी होईल त्याप्रमाणे रस्त्यावरील धूळ वाहनाने उडण्याचे प्रमाण वाढेल. धुळीमुळे अनेक व्याधी प्रवाशांना जडतात. धुळीचे कल्याण, डोंबिवली शहरातील प्रमाण कमी करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने दोन सयंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही दोन सयंत्र पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, असे घनकचरा विभागातील एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
निविदा प्रक्रिया पूर्ण करुन ही दोन सयंत्र खरेदी करण्यात येत आहेत. ही दोन्ही सयंत्र कल्याण, डोंबिवली शहरात कार्यरत राहतील. अनेक वर्षानंतर प्रथमच पालिकेन ही दोन सयंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा… राज्यातून बदल्या होऊन आलेल्या पोलिसांच्या अखेर नेमणुका; ठाणे पोलिसांनी नेमणुकांचे आदेश काढले
कल्याण, डोंबिवली शहरातील अनेक भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. इतर विकास कामे सुरू आहेत. या कामांमुळे शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात खड्डे भरणीसाठी सिमेंट, मातीचा वापर केला जातो. पाऊस कमी झाला की सिमेंट, माती सुकून जाते. सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे ही माती हवेत उडत राहते. हवा प्रदूषण होते. त्याचा त्रास प्रवाशांसह चालकांना होतो.
कल्याण, डोंबिवलीत प्रवास करणारा बहुतांशी प्रवासी हा रिक्षा, दुचाकी अशा उघड्या वाहनांमधून प्रवास करणारा आहे. त्यांना या धुळीचा सर्वाधिक त्रास होतो. ही धूळ आरोग्याला घातक असल्याने नागरिक खोकला, सर्दी, धुळीचा त्रास सहन न होणारे नागरिक आजारी पडतात.
हेही वाचा… ठाण्यातील रुग्णालयामधील मृत्यूप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल – मंत्री दीपक केसरकर
शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी पालिकेकडून अनेक उपक्रम मागील तीन वर्षापासून राबविले जात आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून नागरिकांना धुळीपासून मुक्त ठेवण्यासाठी धूळ नियंत्रणासाठी दोन सयंत्र खरेदीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कल्याण, डोंबिवलीतील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर ही वाहने धूळ नियंत्रणाचे काम करतील. वाहनांमुळे धूळ उडू लागली की ही वाहने प्रक्रिया केलेल्या पाण्याचा फवारा हवेत मारुन उडणारी धूळ जमिनीवर बसविण्याचे किंवा धुळीला आहे त्या ठिकाणीच बसविण्याचे काम करणार आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
पालिका हद्दीत एमएमआरडीएकडून काँक्रीट रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. या रस्त्यांवर अलीकडे वाहनांच्या वर्दळीमुळे धूळ उडत आहे. या धुळीमुळे परिसरातील सोसायट्या, बंगल्यांमधील रहिवाशांना धुळीचा सर्वाधिक त्रास होत आहे. डोंबिवली एमआयडीसीतील रहिवासी, एमआयडीसीतील रहिवासी हा त्रास सहन करत आहेत.
“वर्षातील आठ महिने वाहनांच्या वर्दळीमुळे अनेक रस्त्यांवर धूळ उडते. हवा प्रदूषण त्यामुळे वाढते. प्रवाशांना विविध व्याधी धुळीमुळे जडतात. हे त्रास कमी करण्यासाठी नागरिकांच्या सुदृढ आरोग्याचा विचार करुन दोन धूळ नियंत्रण सयंत्र लवकरच पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.” – अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग.