लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील एका शुभ मंगल कार्यालयातील विशेष कक्षातील एका पिशवीतील ७० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरणाऱ्या मालाड, नालासोपारा येथील दोन मेकअप आर्टिस्टना रामनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.
त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मालाड येथे राहणाऱ्या कल्पना राजेश राठोड (४३), अंकिता शरद इंगळे उर्फ अंकिता परब (रा. नालासोपारा) अशी अटक करण्यात आलेल्या मेकअप आर्टिस्टची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, गेल्या मंगळवारी डोंबिवलीतील घरडा सर्कल येथील सोनम सभागृहात पूजा मनोज गुप्ता यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आरोपी कल्पना, अंकिता मेकअप आर्टिस्ट म्हणून आल्या होत्या. संयोजक कार्यक्रमाच्या गडबडीत आहेत या संधीचा गैरफायदा घेऊन कल्पना, अंकिता यांनी पूजा यांच्या पिशवीत ठेवलेले सोन्याची साखळी, कर्ण कंकण, पाच हजाराची रोख असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज घेऊन संशयास्परित्या सभागृहातून पलायन केले.
हेही वाचा… कल्याणमध्ये दहशत पसरविणारा गुंड येरवडा कारागृहात स्थानबध्द
विशेष खोलीतील पिशवीत सोन्याचा ऐवज नसल्याने त्याची शोधाशोध करुनही तो मिळत नसल्याने पूजा यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी तात्काळ साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, हवालदार प्रशांत सरनाईक, दत्ता कुरणे, देविदास पोटे, आशा सूर्यवंशी यांचे शोध पथक तयार केले. सोनम सभागृहातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले. त्यावेळी आरोपी कल्पना, अंकिता शुभ मंगल कार्यालयातून संशयास्पदरित्या बाहेर जात असल्याचे पथकाला दिसले.
हेही वाचा… कल्याण: भटक्या कुत्र्यांना खायला देते म्हणून तरुणीला जीवे मारण्याची धमकी
पोलिसांना या दोघींवर संशय आला. त्यांनी पूजा यांच्याकडून कल्पना, अंकिताचे मोबाईल घेतले. त्यांचा तांत्रिक माहितीच्या आधारे ठावठिकाणा शोधला. त्या डोंबिवली जवळील दावडी-सोनारपाडा भागात असल्याचे आढळले. पथकाने त्यांना ताब्यात घेतले. महिला पोलीस उपनिरीक्षक आशा निकम यांनी त्यांची झडती घेतली. त्यावेळी चोरीचा ऐवज त्यांच्याजवळ आढळून आला.