डोंबिवली : डोंबिवली जवळील कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पिसवली गावात आपल्या कुटुंबासमवेत राहत असलेल्या दोन अल्पवयीन मुली गेल्या मंगळवारपासून राहत्या घरातून निघून गेल्या आहेत. या दोन्ही मुलींचा कुटुंबीयांनी नातेवाईक, आपल्या मूळ गावी, कल्याण, डोंबिवली शहर परिसरात शोध घेतला. त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी सोमवारी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

तक्रारदार मुलीचे वडील डोंबिवली जवळील पिसवली गाव हद्दीत टाटा पाॅवर नाका भागात राहतात. हे कुटुंब मुळचे बिहार राज्यातील धनगाई जिल्ह्यातील रहिवासी आहे. १२ आणि १४ वर्षाच्या या मुली आहेत. त्या हिंदी, भोजपुरी भाषा बोलतात. या दोन्ही मुलींचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. या दोन्ही मुलींची अल्पवयीन बहीण घरात होती. या तिन्ही बहिणी वडील कामावर गेल्यावर घरात एकट्या राहत होत्या. गेल्या मंगळवारी वडील घरात नसताना १२ आणि १४ वर्षाच्या दोन्ही मुली आपल्या लहान बहिणीला दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान आम्ही आता गावी जात आहोत असे सांगून घरातून निघाल्या. तिसऱ्या क्रमांकाची बहीण बालिका असल्याने ती यावर काही बोलली नाही.

वडील घरी आल्यानंतर दोन मुली घरात नसल्याचे त्यांना समजले. त्या गावी गेल्या आहेत असे त्यांना समजले. त्यांनी बिहारमधील आपल्या मूळ गावी चौकशी केली. कल्याण रेल्वे स्थानक परिसर, नातेवाईक, डोंबिवली, कल्याण परिसरात मुलींचा शोध घेतला. त्या कोठेही आढळून आल्या नाहीत. आठवडाभर शोध घेतल्यानंतरही मुली कोठेही आढळून न आल्याने त्यांना अज्ञाताने फूस लावून पळून नेले असल्याचा संशय व्यक्त करून मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती जगताप याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader