कॉलमला तडे गेल्याने पालिकेने खोली केली रिकामी
कळवा येथील सूर्या नगर भागात शनिवारी दुपारी श्री साईनिवास अनधिकृत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील स्लॅबचे प्लास्टर पडून दोन चिमुकले जखमी झाले असून त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कॉलमला तडे गेल्याने पालिकेने खोली रिकामी केली असून त्याचबरोबर पालिकेने इमारतीच्या बांधकामाचे संरचनात्मक परिक्षण सुरू केले आहेत. या अहवालानंतरच इमारती पूर्णपणे रिकामी करायची की नाही, याबाबतची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा >>>कल्याण: कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू; पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे कुटुंबियांचे आरोप
अक्षित आशिष सिंग (४ वर्षे) आणि आर्या आशिष सिंग ( ७ वर्षे) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. अक्षितच्या डोक्याला व कानाला किरकोळ दुखापत झाली आहे. तर आर्याच्या डोक्याला व कमरेला किरकोळ दुखापत झाली आहे. या दोन्ही मुलांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>“सर्वोच्च शक्तीमान माणूस कोण?”, जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपामुळे नव्या चर्चेला सुरुवात
कळवा येथील सूर्या नगर भागात श्री साईनिवास ही अनधिकृत इमारत आहे. ही इमारत १५ वर्षे जुनी असून त्यात एकूण ४५ कुटुंबे राहत आहेत. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर १०४ क्रमांकाची खोली गौतम शहा यांच्या मालकीची असून या खोलीत आशिष सिंग हे भाड्याने राहतात. शनिवारी दुपारी खोलीतील स्लॅबचे प्लास्टर पडून त्यात अक्षित आणि आर्या ही दोन मुले जखमी झाले आहेत. या खोलीतील कॉलमला देखील तडे गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच प्रभाग समितीचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागामार्फत या खोलीला टाळे लावले असून खोलीतील सिंग कुटुंबिय नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले आहेत.