बदलापूरः हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या एका शिक्षिकेचे मंगळसुत्र दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी लांबवले आहे. बदलापूर पूर्वेतील छत्रपती शिवाजी चौक ते महात्मा गांधी चौक रस्त्यावर हा प्रकार समोर आला. यावेळी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना गाडीने उडवून देण्याची धमकीही चोरांनी दिली. या प्रकारानंतर परिसरात खळबळ पसरली असून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गीतांजली देवेंद्र समुद्र या शिक्षिका गोळेवाडी परिसरातून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपून आपल्या घरी जात होत्या. त्या आशिष गोळे यांच्या बंगल्यासमोर संस्थानिक बंगल्याजवळून जात असताना छत्रपती शिवाजी चौकाकडून येणाऱ्या दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी गीतांजली समुद्र यांच्याजवळ येऊन दुचाकीवरील पाठिमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या मानेवर थाप मारली. यावेळी त्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र ओढले. गीतांजली यांनी जोरजोराने आरडा ओरड केला तेव्हा दुचाकीस्वारांनी पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना रस्त्यावर उपस्थित काही लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मध्ये येणाऱ्यांना गाडीने उडवू अशी धमक या दुचाकीस्वारांनी दिली. हे दुचाकीस्वार पुढे महात्मा गांधी रस्त्याकडे पळून गेले. ऐन वर्दळीच्या वेळी रात्री आठच्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे घबराट पसरली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.