मुंब्रा शहरात गुन्हेगारांकडून हत्येचे सत्र सुरूच आहे. शहरात मागील दोन दिवसांत दोन जणांची हत्या तर, एकावर चाकूने हल्ला करून हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. या तिन्ही प्रकरणांत मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. यातील एका प्रकरणात अल्पवयीन मुलीनेच तिच्या आईची घरगुती भांडणातून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा- कल्याण, ठाणे ‘आरटीओ’ कार्यालयांमध्ये वाहन चालकांचे हेलपाटे
यातील पहिली घटना २७ डिसेंबर या दिवशी घडली. मुंब्रा येथील रिझवी बाग परिसरात राहणारे इम्तीयाज शेख (३३) हे परिसरात उभे असताना सुलतान शेख हा त्याठिकाणी आला होता. याचा जाब इम्तीयाज यांनी विचारला असता त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी सुलतान याच्या हातात एक सुरा होता. हा वाद मिटविण्यासाठी इम्तीयाज यांचा मुलगा आला असता, सुलतानने इम्तीयाज यांच्या मुलाच्या बोटावर चाकूने वार केला. त्यामुळे इम्तीयाज यांनी सुलतान याच्या हातातील सुरा काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुलताने इम्तीयाज यांच्या पोटावर आणि अंगावर वार केले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात इ्म्तीयाज यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकला मद्यपी, श्वानांचा विळखा
दुसरी घटना ही २८ डिसेंबरला उघडकीस आली. मुंब्रा येथील अमृतनगर भागात सबा मेंहदी हाशमी (२७) या हिची तिच्या १७ वर्षीय मुलीने मानेवर, छातीवर चाकूने भोसकून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही हत्या करण्यास तिच्या एका मित्रानेही मदत केली आहे. त्यानंतर दोघाही जणांनी घराला बाहेरून कूलूप लावून पळ काढला होता. सबा हिची बहिण तिला फोन करत होती. परंतु फोन कोणीही उचलत नसल्याने तिने याची माहिती सबाच्या शेजारी राहणाऱ्यांना दिली. त्यानंतर स्थानिकांनी कुलूप उघडले असता सबाचा मृतदेह त्यांना आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी सबा हिच्या मुलीला आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा- कल्याण: दहावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या
तर तिसरी घटना ही २७ डिसेंबरला रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली. मोहम्मद सुलतान शेख (२६) हे त्यांच्या आईसाठी औषधे आणण्यासाठी जीवनबाग येथून जात असताना बबली नावाच्या एका व्यक्तीने त्याचे पाकिट काढून घेतले. त्यामुळे मोहम्मद हे घरी येऊन त्यांच्या भावाला घेऊन आले असता बबलीने मोहम्मद यांच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.