भिवंडी येथील इदगाह भागातील अमानिया तकिया कब्रस्तान परिसरात दोन मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळ जादूटोण्याचे साहित्य आढळून आल्यामुळे दोघांची हत्या जादूटोण्याच्या प्रकारातून घडल्याचा संशय व्यक्त करताना पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
अमानिया शहा तकिया कब्रस्तान परिसरात एका व्यक्तीस सकाळी दहाच्या सुमारास एक मृतदेह दिसला. तर दुसरी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसल्याने त्याने या घटनेची माहिती भोईवाडा पोलिसांना दिली. त्यानंतर भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळावरून एक मृतदेह ताब्यात घेतला तर दुसऱ्या जखमीला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या दोघांपैकी एका मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह मिनरूल ईलाही शेख (४५) यांचा आहे. घटनास्थळी लिंबू, टाचण्या, लोखंडी खिळे, काळी बाहुली असे जादूटोण्यासाठी लागणारे साहित्य सापडले आहे. त्यामुळे जादूटोण्याच्या प्रकारातून हे हत्याकांड झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two peoples kill in bhivandi