कल्याण – येथील पारनाका भागातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या दोन जणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करा, अन्यथा भाजपतर्फे उग्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला होता.
सूरज भालेराव, संदीप महाले अशी अटक संशयीत मारेकऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणात अन्य तीन जण असण्याची शक्यता वर्तवून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी हेमंत परांजपे एका विवाह सोहळ्यावरून आपल्या परिचिताच्या मोटारीतून कल्याणमधील आपल्या पारनाका येथील घरी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पोहचले. मोटारीतून उतरल्यानंतर काही वेळ हेमंत परांजपे आपल्या घराबाहेर उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले. त्यांनी भाजप कार्यकर्ते हेमंत परांजपे यांना, काय रे तू लय माजलास काय. तु आमच्या दादाला वाईट बोलतोस काय, असे बोलून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यांना जमिनीवर पाडून त्यांच्या पायावर सिमेंटचे पेव्हर ब्लाॅक मारून त्यांना जखमी केले.
हेही वाचा – ठाणे : स्वागतयात्रेत तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी युवा दौड
u
रात्रीची वेळ असल्याने यावेळी हेमंत यांच्या बचावासाठी कोणीही पुढे आले नाही. बेदम मारहाण होत असताना हेमंत यांनी जोराने ओरडा केल्याने आपण आता पकडले जाऊ या भीतीने मारेकरी तेथून पळून गेले. हा मारहाणीचा प्रकार पारनाका भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. हेमंत यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन मारेकऱ्यांविरुद्ध तक्रार केली होती.
भाजप कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याने भाजप शहराध्यक्ष वरूण पाटील यांनी हा परांजपे यांच्यावर नव्हे तर हा भाजपवर हल्ला झाला आहे. या प्रकरणातील मारेकऱ्यांना पोलिसांनी तातडीने अटक करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
हेही वाचा – डोंबिवलीत रामनगरमध्ये एका रात्रीत सहा दुकानांमध्ये चोरी
बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी तपास पथके तयार करून दोन जणांना अटक केली आहे. उर्वरित तीन जणही या प्रकरणात सहभागी असण्याचा अंदाज बांधून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.