कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागात एका गाय-म्हशींच्या गोठ्यात पहाटेच्या वेळी चोरी करण्यास आलेल्या दोन जणांना गोठ्याच्या मालकाच्या सर्तकतेमुळे पकडण्यात यश आले. एका चोराला पकडताना त्याने पळून जाण्यासाठी गोठ्याच्या मालकावर चाकूने हल्ला केला. तो परतून लावत गोठ्याच्या मालकाने चोरट्याला पकडले. इतर नागरिकांनी पळून जाणाऱ्या दुसऱ्या चोरट्याला पकडले.
हेही वाचा- ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकात अपंग महिलेचा लाखोंचा ऐवज चोरीला; दोन चोरांना अटक
रोशन शर्मा, कृष्णा उर्फ बबल्या अशी आरोपींची नावे आहेत. ते कल्याण पूर्व भागातील रहिवासी आहेत. पोलिसांनी सांगितले, जयहिंद रामकेवल यादव यांचा काटेमानिवली भागात गोठा आहे. पहाटे चार वाजल्यापासून गोठ्यात शेणगोठा करणे, म्हशीचे दूध काढून किटल्यांमधून विक्रीसाठी पाठविण्याची कामे केली जातात. यादव आणि त्यांचे सहकारी हे काम करतात. रविवारी सकाळी गोठ्यातील कामगार आपल्या कामात व्यस्त होते. यावेळी गोठ्याचा दरवाजा उघडून आरोपी रोशन, बबल्या गोठ्यात शिरले. त्यांनी कामगारांची नजर चुकवून गोठ्याच्या कार्यालयातील लॅपटाॅप, चोरण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा- ठाणे; मलेशियात नोकरी लावण्याचे अमीष दाखवून चार जणांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल
कार्यालयात काही हालचाल होत असल्याचे मालक जयहिंद यांच्या निदर्शनास आले. ते कार्यालयात गेले तेव्हा त्यांना दोन चोर चोरी करत असल्याचे दिसले. जयहिंद यांनी चोर म्हणून ओरडा करताच एका चोरट्याने जवळील चाकूने त्यांच्यावर वार केला. तो त्यांनी परतून लावला. एक चोरटा पळून जात होता. गोठ्यातील कामगार, पादचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. या दोघांना पकडून कामगारांनी कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.
जयहिंद यादव यांच्या तक्रारीवरुन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.