लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : अंबरनाथ येथील एमआयडीसीत दोन वर्षापूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन फरार आरोपींना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील घारिवली गावातून अटक केली आहे. मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या या दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विविध भागात शोधकार्य सुरू ठेवले होते. अखेर हे दोन्ही गुन्हेगार कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना सापडले.

किरण अशोक गायकवाड (३५, रा. देसलेपाडा, भोपर रोड, डोंबिवली), दिपेश तुळशीराम जाधव (३०, रा. अडवली खुर्द, डोंबिवली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा-डोंबिवलीत आजदेमधील पत्नीचे अनैतिक संबंध समाजमाध्यमात उघड करणाऱ्या पतीविरुध्द गुन्हा

दोन वर्षापूर्वी अंबरनाथमध्ये बेधुंद गोळीबार करून फरार झालेले दोन गुन्हेगार डोंबिवली जवळील घारिवली गाव हद्दीतील रुणवाल गार्डन गृहसंकुल भागात एकमेकांना गुप्तपणे भेटण्यासाठी येणार आहेत अशी गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना दिली.

शिंदे यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, हवालदार गुरनाथ जरग, विलास कडू, उमेश जाधव, अमोल बोरकर यांनी रुणवाल गार्डन भागात सापळा लावला. ठरल्या वेळेत आरोपी किरण गायकवाड, दीपेश जाधव घटनास्थळी आले. त्यांना परिसरात पोलिसांनी सापळा लावल्याची कुणकुण लागताच, त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना घारिवली गाव हद्दीत पकडले.

आणखी वाचा-लोकलमध्ये विसरलेले तीन लाखाचे दागिने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडून दिव्याच्या महिलेला परत

आपण घेरले आहोत, याची जाणीव झाल्याने त्यांनी पोलिसांना प्रत्युत्तर देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. भक्कम कडे केलेल्या पोलिसांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. अनेक वर्ष किरण, दिपेश यांची डोंबिवली ते अंबरनाथ परिसरात दहशत होती. किरण मानपाडा पोलीस ठाण्याच्या अभिलेखात सराईत गुन्हेगार आहे. दोन वर्षापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीखाली कारवाई करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांना त्यांचा ताबा देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

नोव्हेंबर २०२२ मध्ये अंबरनाथ एमआयडीसीतील सुदाम हॉटेल परिसरातील रस्त्यावर गोळीबार झाला होता. बैलगाडा शर्यतीवरून चर्चा करताना झालेल्या वादातून आडिवलीच्या राहुल पाटीलसह त्याच्या साथीदारांवर दिपेश, किरण आणि त्यांच्या साथीदारांनी पिस्तुल, बंदुकांमधून बेधुंद गोळीबार केला होता. पंढरीनाथ फडके याच्या पुढाकाराने १५ जणांनी गोळीबार झाला होता. फडकेच्या टोळीत दिपेश, किरण यांचा समावेश होता. या हल्ल्यातून राहुल पाटील, मुकेश चित्ते, रवी जंगम, सोनू ठाकूर, अतुल केणे हे थोडक्यात बचावले होते. त्यानंतर पाटील, फडके गटात वैमनस्य निर्माण झाले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two persons arrested in ambernath firing in gharivli in dombivli mrj