कल्याण – विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना येथील बाजारपेठ पोलिसांनी डोंबिवलीतील दोन जणांना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सोमवारी सापळा लावून अटक केली. त्यांच्याकडून पिस्तुल, जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत.

विनय हरीहरन अय्यर (२७) असे एका इसमाचे नाव आहे. ते ओला उबर मोटारीचे चालक म्हणून व्यवसाय करतात. डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ भागात ते राहतात. गणेश विनोद तिवारी (२६) असे दुसऱ्या इसमाचे नाव आहे. ते डोंबिवली जवळील खोणी गाव परिसरातील म्हाडा गृहसंकुलात राहतात. तेही चालक म्हणून व्यवसाय करतात.

हेही वाचा >>>जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका…तुमचे काम बोलतयं

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांना गुप्त माहिती मिळाली की कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात फोर्टिस रुग्णालय रस्त्यावर दोन इसम एका रिक्षेमधून पिस्तुल आणि सोबत जिवंत काडतुस घेऊन फिरत आहेत. पोलीस निरीक्षक डुकळे, गुन्हे शोध पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांच्या पथकाने तातडीने कृषी उत्पन्न बाजार समिती भागात सापळा लावला. फोर्टिस रुग्णालय भागातील रस्त्यावर पोलिसांनी रिक्षेतील दोन जणांना अडविले. त्यांची तपासणी केली. त्यांच्याजवळ एक पिस्तुल, दोन जिवंत काडतुस आढळून आली. पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली.

पोलिसांनी दोघांकडून रिक्षेसह एकूण दोन लाख ३० हजार रूपयांचा ऐवज जप्त केला. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना हे दोघे शस्त्र घेऊन फिरत होते. पोलिसांनी दोघांंविरुध्द भारतीय हत्यार कायद्याने गु्न्हा दाखल केला आहे.