लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : घोडबंदर येथील कावेसर भागात सोमवारी पहाटे एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा टेम्पो मुंबईच्या दिशेने घेऊन जात असताना, टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना धडक दिली आणि त्यानंतर टेम्पो मेट्रो कामाकरिता खोदलेल्या खड्ड्यात जाऊन पडला. या अपघातात एका रिक्षाचालकाचा मृत्यु झाला तर, दुसरा रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे.

जितेंद्र मोहन कांबळे (३१) असे अपघातात मृत पावलेल्या रिक्षाचालकाचे नाव असून ते वर्तकनगर येथील नेहरुनगर भागात राहत होते. तर, गणेश विश्वनाथ वाघमारे (२९) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव असून त्यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाणे येथील घोडबंदर भागातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. दुपार आणि रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांची वाहतूक या मार्गावरून सुरू असते. त्यातच या मार्गावर मेट्रो प्रकल्पाबरोबरच मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीचे काम सुरू आहेत. त्यामुळे कोंडीची समस्या सातत्याने निर्माण होत आहे. या मार्गावरून सोमवारी पहाटे एक अल्पवयीन मुलगा टेम्पो घोडबंदरहून मुंबईच्या दिशेने घेऊन जात होता.

आणखी वाचा-डोंबिवलीत ग प्रभागात फेरीवाला हटाव पथकाच्या वाहनावर दगडफेक

कावसेर भागात त्याचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना धडक दिली. त्यात जितेंद्र मोहन कांबळे आणि गणेश विश्वनाथ वाघमारे हे दोघे रिक्षाचालक गंभीर जखमी झाले. त्यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेमधून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे जितेंद्र कांबळे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोन्ही रिक्षांना धडक दिल्यानंतर टेम्पो बाजूलाच असलेल्या मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात जाऊन पडला. यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी खड्डयात पडलेला टेम्पो आणि रस्त्याच्या बाजूला असलेली अपघातग्रस्त वाहने टोइंग वाहनाच्या साहाय्याने बाजूला करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरक्षितेच्या कारणास्तव धोकापट्टी बांधण्यात आली आहे.

Story img Loader