डोंबिवली– येथील पश्चिमेतील उल्हास खाडीवर बांधण्यात आलेला मोठागाव-माणकोली उड्डाण पूल मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर डोंबिवलीत वाहतूक कोंडी नको म्हणून माणकोली पूल ते कोपर उड्डाण पूल दरम्यानच्या रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यास वाहतूक विभागाने प्रतिबंध केला आहे. माणकोली पूल खुला झाल्यानंतर तात्काळ या नियमाची वाहतूक विभागाकडून अंमलबजावणी केली जाणार आहे, असे डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर खाडीवर उभारण्यात आलेला १२७५ मीटर लांबीचा उड्डाण पूल बांधून पूर्ण झाला आहे. १८५ कोटीचा निधी या पुलासाठी खर्च करण्यात आला आहे. पुलाची अंतीम टप्प्यातील कामे एमएमआरडीएकडून सुरू आहेत. सन २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या पुलाचे काम ३६ महिन्यात म्हणजे २०१८ मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. भूसंपादन, शेतकरी मोबदला, तांत्रिक अडथळा आणि करोना महासाथीमुळे पुलाच्या उभारणीला विलंब झाला.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमी जलमय; पार्थिव नेताना नागरिकांचे हाल 

खाडीवरील पुलाचे, भिवंडीकडील पोहच रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. डोंबिवली बाजूकडील स्वामी नारायण सिटी, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांच्या बंगल्या समोरील पोहच रस्त्यांची कामे अंतीम टप्प्यात आहेत. पूल उद्घाटनासाठी सज्ज होणार असल्याने डोंबिवली वाहतूक विभागाने पूल सुरू झाल्यानंतर डोंबिवलीत अभूतपूर्व वाहतूक कोंडी नको म्हणून खबरदारीच्या उपाययोजना घेणे सुरू केले आहे.

गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’ने ‘माणकोली पूल सुरू झाल्यानंतर डोंबिवली कोंडीच्या विळख्यात’ वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर वाहतूक, उपप्रादेशिक, पुालिकेने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. गेल्या महिन्यात रेतीबंदर फाटकावरील उड्डाण पुलासाठी १६८ कोटीचा निधी शासनाने मंजूर केला.

वाहने उभी करण्यास प्रतिबंध

डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील स्वामी नारायण सिटी, नवनाथ मंदिर ते रेतीबंदर चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूस ७४० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने २४ तास उभी करण्यास वाहतूक विभागाने प्रतिबंध केला आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये दोन बहिणींची ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण

तसेच, रेतीबंदर चौक, पंडित दिनदयाळ रस्ता, सम्राट चौक, डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानका जवळील (व्दारका हॉटेल) ते कोपर पूल दरम्यानच्या पंधराशे मीटर परिसरात २४ तास प्रतिबंधक केला आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांना मात्र या प्रतिबंधातून मुक्त ठेवण्यात आले आहे.

“मोठागाव माणकोली उड्डाण पूल सुरू झाल्यानंतर डोंबिवली शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हे नियोजन वाहतूक विभागाच्या उपायुक्तांच्या आदेशावरुन केले आहे. पूल सुरू झाल्यानंतर त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल.” उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two side parking prohibited between mankoli to kopar bridge in dombivli zws
Show comments