ठाणे : येथील भूमि अभिलेख उप अधीक्षक चांगदेव मोहळकर आणि भूकरमापक श्रीकांत रावते यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराला जमीन मोजणी करुन देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूमि अभिलेख विभागात चांगदेव मोहळकर हे उप अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांच्या जमीनीची मोजणी करायची होती. यासाठी ते ठाण्यातील भूमी अभिलेख कार्यालयात गेले होते. २७ फेब्रुवारीला तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

दरम्यान, या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाची पडताळणी केली असता, भूकरमापक श्रीकांत रावते यांनी एक लाख रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडअंती ७५ हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच मोहळकर यांनी देखील लाच देण्यास तक्रारदाराला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी सापळा रचून श्रीकांत रावते याला ७५ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. तसेच, पथकाने चांगदेव मोहळकर यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.