डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडीमध्ये एका विकासकाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता उभारलेले दोन माळ्याचे बेकायदा इमारतीचे बांधकाम ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी मंगळवारी तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. बेकायदा बांधकाम केल्याबद्दल विकासक गिरीश काळू जोशी आणि इतर भागीदार यांच्यावर एमआरटीपीचा फौजदारी गुन्हा विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल केला.
डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी भागात गोकुळ रुग्णालयाच्या पाठीमागील बाजुला आणि जुना रिक्षा वाहनतळाच्या पुढील भागात गिरीश काळू जोशी आणि इतर यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता दोन माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बेकायदा बांधकाम केले होते. ५० बाय ६० चौरस फूट क्षेत्रात हे बांधकाम होते. या बांधकामाविषयी पालिकेत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी गिरीश काळू जोशी आणि इतर यांना बांधकामाची अधिकृतता सिध्द करणारी कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावली होती.
नोटीस बजावूनही गिरीश जोशी पालिकेत हजर झाले नाहीत. त्यांना सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते. त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. जोशी यांचे बांधकाम ह प्रभाग अधिकाऱ्यांनी अनधिकृत घोषित केले. साहाय्यक आयुक्त सावंत यांनी बांधकामधारक गिरीश जोशी यांना १५ दिवसात ठाकुरवाडीतील बेकायदा इमारत १५ दिवसात स्वताहून तोडून टाकण्याचे आदेश दिले होते. ही कार्यवाही जोशी यांनी केली आहे. मंगळवारी तोडकाम पथक घेऊन आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त सावंत, अधीक्षक अरूण पाटील यांनी गिरीश जोशी यांचे बेकायदा बांधकाम जेसीबाच्या साहाय्याने भुईसपाट केले.
पालिकेच्या नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता हे बांधकाम केल्याबद्दल आयुक्त डाॅ. जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अरूण पाटील यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात बांधकामधारक गिरीश जोशी यांच्या विरुध्द महाराष्ट्र पालिका अधिनियम आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाने तक्रार केली. पोलिसांनी एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला आहे.
ह प्रभागातील अधिकाऱ्यांकडून भूमाफियांविरुध्द गेल्या वर्षभरात सुमारे १० ते १५ हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ह प्रभागात ६५ महारेरा प्रकरणातील एकूण १८ इमारती आहेत. नऊ इमारती आरक्षित भूखंडावर आहेत. ठाकुरवाडीत गिरीश काळू जोशी यांनी बेकायदा बांधकाम केले होते. ते अनधिकृत म्हणून घोषित केले होते. हे बांधकाम जोशी यांनी स्वताहून पाडून न घेतल्याने त्या बांधकामांवर कारवाई करून त्यांच्यावर एमआरटीपीचा गुन्हा विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. राजेश सावंत साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग. डोंबिवली.